विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : कोरोना महामारी विरोधातील भारताची लढाई मजबुतीने पुढे चालली आहे. ती अधिक प्रभावी करण्यासाठी ३ मे पर्यंत लॉकडाऊनच्या मुदतीत वाढ करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केली. देशाला संबोधित करताना मोदी म्हणाले, “आपल्या त्यागामुळेच कोरोनामुळे होणारे नुकसान टाळले आहे. आपण अनेक कष्ट सोसून देश वाचवला आहे. आपण शिस्तबद्ध सैनिकासारखे देशासाठी त्याग आणि काम करीत आहात. संविधानातील वुई द पीपल ही भावनाच आपण सर्वजण साकार करीत आहात. बाबासाहेब आंबेडकरांना मी आपल्या सर्वांच्या वतीने नमन करतो. भारत वर्षात चैत्राचे उत्सव सुरू आहेत. लॉकडाऊनच्या बंधनात हे सण साधेपणाने साजरे करीत आहेत. हे खूप प्रेरणादायी आहे.
जगातील परिस्थितीची आपल्याला जाणीव आहे. भारताने कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी केलेल्या उपाययोजनांचे आपण साक्षीदार आहात. सहभागी आहात. भारताने अगदी सुरवातीपासूनच कठोर उपाययोजना केल्या. जलद निर्णय घेतले. या संकटात कोणत्याही देशांशी तुलना उचित नाही पण प्रगत देशांच्या तुलनेत भारताची स्थिती कितीतरी सुसह्य आहे. प्रगत देशात कोरोनाचा राक्षसी फैलाव झाला आहे. भारताने जलद निर्णय घेतले नसते तर देशात काय घडले असते याची नुसती कल्पना करून अंगावर काटे येतात. लॉकडाऊनमुळे खूप मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागले आहे. पण भारतीयांच्या जीवनापेक्षा ते अधिक नाही. सर्वांनी आपापल्या परीने कोरोना विरोधातील लढाईत योगदान दिले आहे.
लॉकडाऊन वाढविण्याच्या निर्णयाचे WHO कडून स्वागत
भारतात कोविड १९ च्या प्रादूर्भावाला प्रतिबंध करण्यासाठी लॉकडाऊन वाढविण्याच्या पंतप्रधान मोदींच्या निर्णयाचे WHO ने स्वागत केले आहे. कोविडच्या साथी विरोधात लढण्याच्या भारतीयांच्या धैर्याची WHO विभागीय संचालिका डॉ. पूनम खेत्रपाडा सिंग यांनी तारीफ केली. त्या म्हणाल्या, “मोठ्या आर्थिक आणि आरोग्य समस्यांशी झुंजताना भारतीयांनी असामान्य धैर्य दाखविले आहे. लॉकडाऊन पासून सोशल डिस्टंसिंगसारख्या योजनांची अंमलबजावणी प्रभावी ठरली आहे.” याला WHO चे कार्यकारी संचालक जे. रेयान यांनी दुजोरा दिला. कांजिण्या आणि पोलिओ सारख्या महाभयानक साथींना हरविण्यात भारताने जगाचे नेतृत्व केले आहे, असे ते म्हणाले.
France to extend #Coronavirus lockdown to last until May 11, says President Emmanuel Macron: AFP news agency (File pic) pic.twitter.com/7cMWx89LjS
— ANI (@ANI) April 13, 2020
कोरोना विरोधातील लढाई पुढे कशी न्यायची? प्रत्येकाकडून लॉकडाऊनच्या मुदतीत वाढ करावी लागेल. ३ मे पर्यंत लॉकडाऊनमध्ये राहावे लागेल. सर्वांनी लॉकडाऊनच्या मुदतीत स्वयंशिस्तीचे पालन करावे. कोरोना फैलाव रोखण्यासाठी हे करावेच लागेल. कोरोना हॉटस्पॉट शोधून आपल्याला अधिक सावध राहावे लागेल. नवे हॉटस्पॉट बनू नये यासाठी कठोर पावले उचलावी लागतील. २० एप्रिल पर्यंत लॉकडाऊनच्या पालनाकडे बारकाईने लक्ष दिले जाईल. ही अग्निपरीक्षा द्यावी लागेल. २० एप्रिल नंतर हॉटस्पॉट वगळून काही ठिकाणी मोकळीक दिली जाऊ शकते. कोरोना आढळल्यास ही मोकळीक ताबडतोब रद्द केली जाईल.
उद्या याची मार्गदर्शक सूची जारी केली जाईल. गरीबांच्या रोजीरोटीसाठी ही सूट काही ठिकाणी देण्यात येईल. पण लॉकडाऊन का़यम राहील. देशात अन्नधान्याचा साठा पुरेसा आहे. सप्लाय चेन सुरळित केली जात आहे. वैद्यकीय सुविधा वाढविण्यात येत आहेत.
विश्व कल्याणासाठी कोरोनाची लस बनविण्यासाठी पुढे यावे.
देशासाठी सप्तपदी…!!
- ज्येष्ठांकडे लक्ष द्या.
- लॉकडाऊन, सोशल डिस्टंसिंग आवश्यक. मास्क वापरा.
- आपली प्रतिकार शक्ती वाढवा.
- आरोग्य सेतू मोबाईल अँप डाऊनलोड करा.
- गरीबांसाठी मदत करा.
- कोणासही नोकरीवरून काढू नका.
- कोरोना योद्ध्यांची मदत करा. त्यांचा सन्मान करा.
ही सप्तपदी ३ मे पर्यंत पाळा. लॉकडाऊनच्या मुदतीत नियमांचे पालन करा.
- २० एप्रिल पर्यंत कठोर मूल्यमापन
- २० एप्रिल पर्यंत प्रत्येक प्रदेश, जिल्हा, तालुका, गाव, पोलिस चौकी क्षेत्र यांचे कठोर परीक्षण केले जाईल. जी क्षेत्रे या परीक्षेत सफल होतील, तेथेच जीवनावश्यक व्यवहारांसाठी काही मर्यादित सवलती दिल्या जातील.
- नवे हॉटस्पॉट तयार होऊ देऊ नका. असे झाल्यास मर्यादित सवलती देखील ताबडतोब रद्द केल्या जातील.
- लॉकडाऊनच्या नियमांचे कठोर पालन केले नाही तर कोरोना विरोधातील लढाई अधिक अवघड होईल. असे काहीही करू नका.