- सोनियांच्या बैठकीला मायावती, अखिलेश, केजरीवाल राहणार गैरहजर
- उद्धव ठाकरे, ममता राहणार उपस्थित
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी २२ मे रोजी विरोधी पक्षांची बैठक बोलवली आहे. कोरोना च्या पार्श्वभूमीवर आज दुपारी ३.०० वाजता ही बैठक होत आहे. मात्र अरविंद केजरीवाल, मायावती आणि अखिलेश यादव है बैठकीला गैरहजर राहणार आहेत.
प्रियांका गांधी यांनी उत्तर प्रदेशात लक्ष घातल्यापासून मायावती आणि अखिलेश यादव हे नेते काँग्रेसपासून दूर गेले आहेत. त्यातही प्रियांका गांधी यांची वर्तणूक अन्य राजकीय पक्षांबाबत आकसाची आहे. या पार्श्वभूमीवर आजच्या होणाऱ्या बैठकीतील दुरावा विरोधी एेक्यालाही सुरूंग लावणारा ठरणार आहे.
या घडामोडींमुळे विरोधकांची एेक्याची गाडी सुरू होण्यापूर्वीच पंक्चर झाल्याचे स्पष्ट झाले आहे. केंद्र सरकारने नुकतेच 20 लाख कोटीचे पॅकेज जाहीर केलं आहे. या पॅकेजमध्ये गरिबांना कोणतीही मदत करण्यात आली नसल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. तसंच जगातील अनेक शास्त्रज्ञांनी गरिबांना थेट मदत करण्याचे आवाहन केले आहे. मात्र. सरकारने कर्जच जास्त देऊ केले असल्याचे पॅकेजवरून दिसून येत आहे. त्यामुळे कोरोनाच्या या लढाईत गरिबांचे मोठे हाल होत आहेत. असं तज्ञांचं मत आहे.
सोनिया गांधी यांनी बोलावलेल्या या बैठकीला १७ पक्ष सहभागी होणार असून सर्वात महत्वाची बाब म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, बंगालच्या मुख्यमंत्री ममता बँनर्जी, खा. संजय राऊत तर राष्ट्रवादीकडून शरद पवार, अजित पवार उपस्थित राहणार आहेत. ही बैठक व्हिडीओ कॉन्फर्नसद्वारे होत आहे. या बैठकीत शेतकरी, कामगार कायद्यात केलेला बदलावर चर्चा होणार आहे.