पृथ्वीराज चव्हाण काही अन्य वाचाळवीर नेते, संपादक यांच्यासारखे नाहीत. काँग्रेसची हायकमांड संस्कृती आणि ल्यूटन्स दिल्लीचे दरबारी राजकारण यात पृथ्वीराजबाबा मुरलेले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी त्यांच्या इशाऱ्यांकडेही दुर्लक्ष केले तर संधी मिळेल तिथे ढसाढसा रडणाऱ्या कानडी कुमारस्वामींची पुनरावृत्ती महाराष्ट्रात होऊ शकते. अर्थात, शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेसच्या सल्ल्यानेच वागायचे ठरवले असेल तर मग सारेच अवघड आहे.
युगंधर
महाराष्ट्रात सध्या महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आहे. म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे तीन पक्ष मिळून महाविकास आघाडी तयार झाली. महाविकास आघाडीने शिवसेनेचे कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदी बसवले. मुख्यमंत्री जरी शिवसेनेचा असला तरी सरकार मात्र महाविकास आघाडीचेच आहे. म्हणजे तसा समज राज्यातील तमाम जनतेचा आजपर्यंत होता.
आजपर्यंत होता असे म्हणण्याचे कारण म्हणजे राज्याची माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस पक्षाचे दिग्गज नेते पृथ्वीराजबाबा चव्हाण यांनी आपल्या एका कार्यकर्त्याशी दूरध्वनीवर संवाद बोलताना “हे सरकार आमचं नाही. हे सरकार शिवसेनेचं आहे” असे अगदी ठामपणे सांगितले. आता महाविकास आघाडीतून काँग्रेस पक्ष अधिकृतपणे बाहेर पडल्याचे काही ऐकिवात नाही (ते मनाने बाहेर पडले असतील तर माहिती नाही !).
त्यामुळे कार्यकर्त्याशी बोलताना पृथ्वीराजबाबांनी असे वक्तव्य का केले असेल ?, या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी जरा मागे जाऊया. शिवसेनेसोबत सत्तेत सहभागी होण्यास काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी तयार नव्हते, अशी चर्चा तेव्हाच दिल्लीच्या गोटात होती. मात्र, काँग्रेसमधील सोनिया गांधी गटास मात्र सत्तेत सहभागी व्हायचेच होते.
काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेसचे ऐकून शिवसेनेसोबत सत्ता स्थापन केल्यास काँग्रेसला काहीही फायदा होणार नाही. कारण राष्ट्रवादी काँग्रेसचाच सरकारमध्ये वरचष्मा राहिल, असे राहुल गांधी गटाचे म्हणणे होते. अर्थात, त्यात चुकीचे असे काहीही नव्हते हे सद्यस्थितीवरून दिसतेच आहे. मात्र, अखेर शरद पवारांची मध्यस्थी, मनधरणी आणि सत्तेत जाण्याच्या अगतिकतेमुळे अखेर काँग्रेसने पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. मात्र, संधी मिळताच काँग्रेस पाठिंबा काढून घेईन, यावर बहुतांशी राजकीय विश्लेषक ठाम होते.
त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण यांच्या या वक्तव्याचे आश्चर्य वाटण्याचे काहीही कारण नाही. सर्वांत महत्वाचे म्हणजे पृथ्वीराज चव्हाण काही अन्य वाचाळवीर नेते, संपादक यांच्यासारखे नाहीत. मोजूनमापून बोलणे, सनसनाटी वक्तव्ये न करणे आणि खऱ्या अर्थाने संयत नेता म्हणजे पृथ्वीराजबाबा. त्यात काँग्रेसची हायकमांड संस्कृती आणि ल्यूटन्स दिल्लीचे दरबारी राजकारण यात पृथ्वीराजबाबा मुरलेले, म्हणूनच डॉ. मनमोहन सिंग पंतप्रधान असताना त्यांना पंतप्रधान कार्यालयाच्या राज्यमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली होती. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्याच्या तत्कालीन आघाडी सरकारमधील अरेरावी मोडून काढण्यासाठी त्यांना मुख्यमंत्रीपदीही सोनिया गांधींनी नेमले होते. ते काम त्यांनी अगदी व्यवस्थित पार पाडले होते, ते शरद पवारांच्या लकवाछाप वक्तव्यातून सिद्धही झाले होते.
हे सरकार आमचे नाही – पृथ्वीराज चव्हाण
पृथ्वीराजबाबांना कार्यकर्त्याने खरे तर आर्थिक मदतीविषयी फोन केला होता. त्यामुळे त्याला सरकार नेमके कोणाचे याबद्दल मार्गदर्शन करण्याचे काही कारण नव्हते. तरीही पृथ्वीराजबाबा म्हणतात, “मी काही मंत्रिमंडळात नाही. हे आमचं सरकारही नाही, हे शिवसेनेचं सरकार आहे. मी फक्त शिफारस करेन, पण सध्या आर्थिक स्थिती बिकट असल्याने होईल असं मला वाटत नाही”.
त्यामुळे असे पृथ्वीराज चव्हाण सरकार आमचे नाही, असे वक्तव्य करतात, तेव्हा त्याकडे अतिशय गांभिर्याने पाहणे गरजेचे आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या प्रशासकीय कौशल्याबद्दल पृथ्वीराजबाबांनी राज्याच्या नेतृत्वाकडे प्रशासकीय कौशल्याचा अभाव आहे, असे अतिशय गंभीर वक्तव्य केले होते. त्यात आज “हे सरकार आमचं नाही. हे सरकार शिवसेनेचं आहे” या वक्तव्याची भर पडली आहे. आता काही मंडळी याला पृथ्वीराज चव्हाणांना मंत्रिपद मिळाले नाही, म्हणून ते अशी वक्तव्ये करीत असल्याचा दावाही करतील. मात्र, पृथ्वीराज चव्हाण काही थिल्लर प्रकारचे नेते नाहीत, त्यामुळे त्यांचे हे वक्तव्य म्हणजे महाविकास आघाडीवर आता टांगती तलवार असल्याचेच निदर्शक आहे.
पृथ्वीराजबाबांनी अशी थेट टिका करणे याचा एकच अर्थ होते- काँग्रेसला आता सत्तेत राहण्यास रस उरलेला नाही. कारण, काँग्रेससारखा पक्ष अननुभवी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या अपयशाची जबाबदारी घेण्यास आता तयार नाही. त्यामुळेच वेळोवेळी पृथ्वीराज चव्हाण काँग्रेस आणि सरकार यातील अंतर अधोरेखित करीत आहेत. कारण सरकार जरी तीन पक्षांचे असले तरी काँग्रेसला त्यात सध्या काही वाव नाही. त्यामुळे अपयशाची जबाबदारी घेण्यापेक्षा सत्तेतून बाहेर पडणे काय वाईट, असा विचार काँग्रेस हायकमांड करीत असण्याची दाट शंका आहे.
काँग्रेस सरकारमधून बाहेर पडल्यास एकाचवेळी दोन गोष्टी साध्य होतील- एक म्हणजे राज्य सरकारच्या अपयशामध्ये भागिदारी घ्यायची वेळ न येणे आणि दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसला पुन्हा सत्तेतून खाली खेचणे. त्यामुळे आता काँग्रेस हायकमांडने (विशेषत: राहुल गांधी) सत्तेतून कोणत्याही क्षणी बाहेर पडण्याची तयारी केल्याचे संकेतच पृथ्वीराजबाबा देत असावेत. आता मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी या इशाऱ्यांकडेही दुर्लक्ष केले तर संधी मिळेल तिथे ढसाढसा रडणाऱ्या कुमारस्वामींची पुनरावृत्ती महाराष्ट्रात होऊ शकते. अर्थात, शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेसच्या सल्ल्यानेच वागायचे ठरवले असेल तर मग सारेच अवघड आहे.