विशेष प्रतिनिधी
मुंबई : कोरोना संकटाच्या काळात सरकारी, प्रशासकीय पदाधिकारी, अधिकारी यांच्या कृतीवर सोशल मीडियात खालच्या थरावर जाऊन बदनामीकारक टीका – टिपण्णी केली तर सोशल मीडिया अकाउंटच्या admin ला जबाबदार धरून १४४ कलमाखाली कारवाई करण्यात येईल, असा इशारा बृह्नमुंबई पोलिस उपायुक्त प्रणया अशोक यांनी काढलेल्या आदेशात दिला आहे.
२५ मे ते ८ जून २०२० पर्यंत हा आदेश लागू राहील. कोरोना व्हायरसच्या फैलावाच्या पार्श्वभूमीवर कोणतीही अफवा अथवा समाजात तेढ पसरू नये, नागरिकांची असुविधा होऊ नये, या हेतूने संबंधित आदेश काढण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे.
मात्र, यामध्ये सोशल मीडिया फेसबुक, ट्विटर, वॉट्स अप, इन्स्टाग्राम, टिक टॉक आदी सर्व प्रकारांमधील admin ला जबाबदार धरण्याचा अजब प्रकार समाविष्ट करण्यात आला आहे. सोशल मीडियावर कोणीही सरकारवर टीका टिपण्णी करणारी कॉमेन्ट केली, कोरोनाविषयी गैरसमज, दोन समाजात तेढ पसरविणारी प्रतिक्रिया व्यक्त केली तर कॉमेन्ट करणाऱ्या व्यक्तीबरोबरच संबंधित ग्रुपच्या admin ला जबाबदार धरून फौजदारी कायद्याच्या १४४ कलमानुसार त्याच्यावर कारवाई करण्यात येईल.
या आदेशावरून सोशल मीडियातून व प्रसार माध्यमांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटत असून महाराष्ट्रातल्या उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडी सरकारी कारभार झाकण्याचा हा प्रकार असल्याची टीका होत आहे.