संपूर्ण जग कोरोनाविरुद्धची लढाई जिंकण्याची पराकाष्ठा करत असतानाही पाकिस्तानी सैन्याचे भारतात घुसखोरी करण्याचे प्रयत्न थांबलेले नाहीत. मात्र सतर्क भारतीय सैन्याने घुसखोरी करणाऱ्या 8 दहशतवाद्यांसह पाकिस्तानच्या पंधरा जवानांना यमसदनी धाडले आहे.
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : काश्मिरमधील नियंत्रण रेषेचे (एलओसी) उल्लंघन करुन केरन सेक्टर येथून भारतात घुसखोरी करु पाहणाऱ्या पाकिस्तानी सैन्याला भारताने जोरदार तडाखा दिला आहे. दुधनियाल येथील दहशतावाद्यांच्या अड्यावर भारतीय सैन्याने हल्ला चढवला. यात पाकिस्तानी सैन्याच्या 15 जवानांसह 8 दहशतवादी मारले गेले.
किशनगंगा नदीच्या काठावरच्या याच डोंगरी भागातून 5 एप्रिलला दहशतवाद्यांनी घुसखोरीचा प्रयत्न केला होता. त्याहीवेळी भारतीय सैन्याने पाच दहशतवाद्यांना ठार केले. यातले तीन जम्मू-काश्मीरचे होते. इतर दोघांनी जैश-एकडून दहशतवादाचे प्रशिक्षण घेतले होते. भारतीय सैन्याने केलेल्या हल्ल्याची कबुली पाकिस्तानी सैन्याने दिली आहे. मात्र भारतीय सैन्याने नियंत्रण रेषेच्या आत शारदा, दुधनियाल आणि शाहकोट या भागात थेट गोळीबार केला मात्र एका वर्षाच्या मुलीसह केवळ चार नागरिक गंभीर जखमी झाल्याचा दावा पाकिस्तानने केला.
पाकिस्तान सैन्याच्या प्रवक्त्याने सांगितले की, पाकिस्तानी सैन्याने भारतीय हल्ल्याचा प्रतिकार केला. भारतीय गुप्तचर अहवालानुसार, पाकिस्तानी बाजूने झालेल्या मृत्यू लपवण्याचा हा प्रयत्न आहे. भारतीय लष्कराने दारूगोळाचा वापर करून पाकिस्तानच्या लष्कराच्या 15 सैनिकांसह आठ दहशतवाद्यांना ठार केले. लष्कर-ए- तय्यब, जैश ए मोहम्मद आणि हिजबुल मुजाहिद्दीनचे दहशतवादी – काश्मीरमध्ये घुसखोरी करण्यासाठी या भागात वाट पहात होते. राजौरी आणि जम्मू सेक्टरमधील पीर पंजालच्या दक्षिणेकडील ठिकाणीही दहशतवाद्यांनी घुसखोरीचा प्रयत्न केला. त्या भागात जैश ए मोहम्मदचे सत्तर दहशतवादी काश्मिरात घुसण्याच्या तयारीत होते.
एका वरिष्ठ गुप्तचर अधिकाऱ्याने सांगितले की, बालकोट आणि मेंढर भागातून युद्धबंदीचे उल्लंघन होत आहे. नियंत्रण रेषेत होणारा गोळीबार हा योगायोग समजता येत नाही. नियंत्रण रेषेच्या बाजूने परिस्थिती सध्या खूप तापली आहे. पाकिस्तानी सैन्याच्या हल्ल्यात दहशतवादी बर्याचदा जम्मू-काश्मीरमध्ये घुसतात. अंदाज असा आहे की, एकूण 242 दहशतवादी पाकिस्तानातल्या लष्करी तळावर आहेत. काश्मीरच्या तज्ञांच्या मते, भूतकाळातील अनुभवावरून असे दिसून येते की, पाकिस्तानविरूद्ध बोलणार्या सुरक्षा दलांवर आणि राजकीय नेत्यांवर हल्ला करण्याचा या दहशतवाद्यांचा प्रयत्न असेल.