विशेष प्रतिनिधी
मुंबई : विधानपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने महाराष्ट्रातील ‘टाॅप सिक्रेट’ मानले गेलेल्या ‘मातोश्री’ची श्रीमंती प्रथमच जनतेपुढे आली आहे. त्यानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबीयांची संपत्ती (पुत्र आदित्य यांचीही धरून) जवळपास १६० कोटी रूपयांची आहे. तरीही महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांमध्ये, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार व शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांच्या कुटुंबाच्या १६५ कोटी ४२ लाख रूपयांच्या संपत्तीपेक्षा ठाकरे कुटुंबीय थोडे मागेच आहेत. एकुलत्या एक अपत्य असलेल्या सुप्रियांच्या संपत्तीत पिता शरद पवार यांची अधिकृत संपत्ती (३२ कोटी) जमा केल्यास सुप्रियांची एकूण श्रीमंती सुमारे दोनशे कोटींपर्यंत पोहोचते.
उद्धव ठाकरे यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रामध्ये संपत्तीची माहिती उघड केल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांच्या संपत्तीचा तपशीलावर नजर टाकल्यानंतर आजमितीला सुप्रिया याच महाराष्ट्रातील श्रीमंत नेत्या असल्याचे दिसते. त्यांनी शेती हा आपला प्रमुख व्यवसाय व उत्पन्नाचे साधन नमूद केलेले आहे. २०१४च्या तुलनेत २०१९पर्यंतच्या पाच वर्षांत त्यांची श्रीमंती सुमारे ३० कोटींनी वाढली. एवढे असूनही त्यांच्याकडे उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्याप्रमाणे स्वतःच्या मालकीची गाडी नाही. दुसरीकडे, उद्धव यांनी मुख्यमंत्री होण्यापूर्वी आपण ‘बेरोजगार’ असल्याचे अप्रत्यक्षरीत्या नमूद केले आहे. सध्या मुख्यमंत्रीपदाचे मानधन हेच आपल्या उत्पन्नाचे मुख्य साधन असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. ते व पत्नी रश्मी यांच्याकडे १४३ कोटी २६ लाखांची संपत्ती आहे. त्यात पुत्र व महाराष्ट्राचे मंत्री आदित्य ठाकरे यांची १६ कोटींची मालमत्ता गृहित धरल्यास ठाकरे कुटुंबीयांची एकूण संपत्ती १६० कोटींच्या आसपास जाते.
योगायोगाने सुप्रिया यांचे पती सदानंद सुळे हे ठाकरे कुटुंबीयांचे नातेवाईक आहेत. सुप्रिया यांचा विवाह शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुढाकारानेच झाल्याचे राजकीय वर्तुळात नेहमीच बोलले जाते.
सुळे, ठाकरे यांच्यापाठोपाठ माजी मुख्यमंत्री नारायण राणे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा श्रीमंतीमध्ये क्रमांक लागतो. राणे यांची सुमारे ८२ कोटी (२०१८च्या प्रतिज्ञापत्रानुसार), तर अजित पवार यांच्याकडे ७४.४२ कोटींची संपत्ती आहे. दस्तुरखुद्द शरद पवार हे तर या सर्वांच्या तुलनेत ‘गरीब’ असल्याचे दिसते. त्यांची एकूण संपत्ती ३२ कोटी ७३ लाख रूपये आहे. गेल्या पाच वर्षांत त्यांचे उत्पन्न साठ लाख रूपयांनी वाढले. दुसरया शब्दांत, ते आपली एकुलती एक कन्या हिच्यापेक्षा १३२ कोटींनी ‘गरीब’ आहेत.
बिच्चारे… ‘मध्यमवर्गीय’ फडणवीस
या सर्वांच्या तुलनेत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे खूपच मध्यमवर्गीय आहेत. त्यांची एकूण संपत्ती साडेपाच कोटी आहे. पण त्यात सर्वाधिक हिस्सा हा त्यांची बँकर पत्नी अमृता यांच्या मालकीचा व वडिलोपार्जित संपत्तीचा आहे.
ठाकरेंना फटका नोटबंदीचा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१६मध्ये केलेल्या नोटबंदीचा फटका थेट उद्धव ठाकरे यांनाही बसल्याचे त्यांच्या प्रतिज्ञापत्रातून दिसते. २०१६मध्ये ठाकरेंचे उत्पन्न होते २० लाख ६३ हजार रूपये, पण २०१७-१८मध्ये ते झाले फक्त ४ लाख ३६ हजार रूपये. मात्र पुढील वर्षी २०१८-१९ मध्ये तेच उत्पन्न ३२ लाख ५८ हजार झाले.