वृत्तसंस्था
लखनऊ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ एका विशिष्ट समाजासाठी धोकादायक आहेत. त्यामुळे त्यांना बॉंबने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. व्हॉटस अॅपद्वार ही धमकी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे ही धमकी महाराष्ट्रातून देण्यात आली आहे.
२१ मे रोजी रात्री १२,३५ च्या सुमारास ही धमकी आली. त्यानंतर गोमतीनगर पोलीस ठाण्यात यावर गुन्हा दाखल झाला. पोलीसांना खबरदारीचा इशारा देण्यात आल असून धमकी देणाऱ्यास शोधण्यासाठी पोलीसांनी पथके पाठविली आहेत. त्यातील एक पथक मुंबईलाही पाठविण्यात आले आहे.
याबाबत पोलीसांनी सांगितले की ज्या क्रमांकावरून ही धमकी आली आहे तो महाराष्ट्रातील आहे. धमकीत म्हटले आहे की, मुख्यमंत्री योगींना मी बॉंबस्फोट घडवून मारणार आहे. ते एका विशिष्ट समुदायाच्या (धमकीत या धर्माचा उल्लेख करण्यात आला आहे.) जीवावर उठले आहेत.
ही धमकी आल्यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांना तातडीने याची माहिती देण्यात आली. त्यानंतर या घटनेची गंभीर दखल घेण्यात आली. पोलीसांनी कोणाच्या नावावर हा मोबाईल क्रमांक नोंदविला आहे, त्याचीही माहिती काढण्यास सुरूवात केली आहे. त्याचबरोबर लोकेशनही ट्रेस करण्याचे काम सुरू आहे.