विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रातील लॉकडाऊन वाढविल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सायंकाळी केली. राज्यातले लॉकडाऊन १४ एप्रिलला उठणार नाही. ते किमान ३० एप्रिलपर्यंत चालू राहील, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून जाहीर केले. नव्या मुदतीतील लॉकडाऊनचे तपशील व नियमावली १४ एप्रिल पूर्वी जाहीर करीन, असे त्यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, “अत्यंत नाइलाजाने लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय घ्यावा लागतो आहे. सोशल डिस्टंसिंग पाळले तरच कोविड १९ च्या व्हायरसला महाराष्ट्रात रोखता येईल. आपण सर्वांनी धैर्याने आणि शिस्तीने याला तोंड दिले तर कोविड १९ हरविणे अवघड नाही. पण शिस्त पाळलीच पाहिजे. भाजी मंडईसारख्या ठिकाणी गर्दी अजूनही होते आहे. ती गर्दी आपण टाळलीच पाहिजे. कोविड १९ समूदाय संक्रमणापर्यंत आपण रोखू शकलो आहोत. पण शिस्त न पाळता गर्दी करत राहिलो तर सामाजिक संक्रमणाचा धोका आहे आणि तो झाला तर कोविड १९ ला कोणालाच रोखता येणार नाही.”
जनतेच्या सामाजिक शिस्त पाळण्याच्या क्षमतेवर आणि इच्छेवर लॉकडाऊनची मुदत ३० पर्यंत राखणे अवलंबून अाहे, असा इशाराही मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाची आणि सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या राजकारणा पलिकडे जाऊन घेतलेल्या भूमिकांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्तुती केली. ही एकजूट कायम ठेवली तर भारत कोविड १९ मात करेलच पण जागतिक महासत्ता होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.