विशेष प्रतिनिधी
मुंबई : एकीकडे कोरोना फैलावाचा वेग कमी होत असल्याचा दावा केला जात असताना काल संपूर्ण दिवसात २४ तासांत महाराष्ट्रात ७७८ नवे कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले. मालेगाव तर हॉटस्पॉट बनले आहेच पण संपूर्ण उत्तर महाराष्ट्राची वाटचालही हॉटस्पॉटच्या दिशेने होण्याचा धोका वाढला आहे.
राज्यात आज ७७८ नवीन रुग्ण करोना पॉझीटीव्ह असल्याची माहिती समोर आली आहे तसेच १४ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. आतापर्यंत करोना रुग्णांची संख्या ६४२७ झाली असून ८४० रुग्णांना आतापर्यंत बरे होऊन दवाखान्यातून घरी सोडण्यात आले आहे.
महाराष्ट्रात सुरूवातीला करोनासाठी १४ हॉटस्पॉट होते. आता तेथे रुग्ण संख्या नाही त्यामुळे त्याची संख्या कमी करत पाच वर आली आहे. मुंबई महानगर परिसर, पुणे परिसर, नागपूर, नाशिक, असे हॉटस्पॉट असून मालेगाववर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. प्लाझ्मा थेरपीनुसार मुंबईत उपचाराचा प्रयोग केला जाणार आहे. जे रुग्ण बरे झालेत त्यांचे रक्तद्राव घेऊन ते करोनाच्या गंभीर रुग्णांना देऊन त्यांच्यामध्ये अॅण्टीबॉडीज वाढविण्याचे काम करतील.
मुंबईमध्ये संस्थात्मक क्वारंटाईन वाढविण्यावर भर देण्याच्या सूचना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मुंबई महापालिकेला दिल्या आहेत. त्यासाठी शाळा, महाविद्यालये यांचा वापर करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्रातील करोना हॉटस्पॉटची संख्या १४ वरून ५ वर आणण्यात यश मिळाल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ९६ हजार ३६९ नमुन्यांपैकी ८९ हजार ५६१ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ६४२७ जण पॉझिटिव्ह आले आहेत.
सध्या राज्यात १ लाख १४ हजार ३९८ लोक होम क्वारंटाइनमध्ये असून ८ हजार ७०२ लोक संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. राज्यात १४ रुग्णांचा आज मृत्यू झाला. मुंबईत ६, पुणे ५, नवी मुंबई, नंदुरबार आणि धुळ्यात प्रत्येकी एक मृत्यू झाला आहे.
मत्यूंपैकी आठ पुरूष तर, सहा महिला आहेत. दोघे जण ६० वर्षांवरील आहेत. ४० ते ५९ वयोगटातील ९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर मृत तीन रुग्ण हे ४० वर्षांखालील आहेत. आज राज्यभरात नोंद झालेल्या नव्या रुग्णांपैकी ५२२ जण हे मुंबईतील आहे. त्यामुळे मुंबईतील एकूण करोनाबाधितांचा आकडा ४२०५ इतका झाला आहे. ३० एप्रिल ते १५ मे हा कालावधी राज्याच्यादृष्टीने अतिश्य महत्त्वाचा आहे.