विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ३०२ झाली असून नवीन रुग्णांमध्ये ५९ रुग्ण मुंबईचे आहेत.
आज राज्यात एकूण ८२ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. यात मुंबईतील मागील चार दिवसांमधील अहवालांचा समावेश आहे. त्यामुळे राज्यातील एकूण करोना बाधित रुग्णांची संख्या ३०२ झाली आहे. या नवीन रुग्णांमध्ये ५९ रुग्ण मुंबईचे आहेत, १३ रुग्ण मुंबई परिसरातील शहरी भागातील आहेत तर ५ रुग्ण पुण्याचे, ३ नगरचे आणि २ बुलढाणा येथील आहेत. राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली.
कोरोना निदानासाठी देशभरातील प्रयोगशाळाचे जाळे विस्तार करण्यात आला असून ‘आयसीएमआर’च्या अनुमतीने सध्या राज्यात १० शासकीय आणि १३ खाजगी अशा एकूण २३ प्रयोगशाळा करोना निदानासाठी सिध्द झाल्या आहेत.
यातील खाजगी प्रयोगशाळांकडील अहवालांचे मूल्यमापन करुन त्यानंतर त्यांचे अहवाल अंतिम करण्यात येत आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ६ हजार ३३१ नमुन्यांपैकी ५ हजार ७८० जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ३०२ जण पॉझिटिव्ह आले आहेत.
आतापर्यंत ३९ करोना बाधित रुग्णांना ते बरे झाल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात २३,९१३ व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून १४३४ जण संस्थात्मक क्वारंटाईन मध्ये आहेत. नवीन करोना विषाणू आजार प्रतिबंध व नियंत्रण पूर्वतयारी म्हणून राज्यात सर्व जिल्हा रुग्णालये तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत.