वृत्तसंस्था
चंदीगड : नांदेडच्या गुरुद्वाराला भेट देऊन पंजाबात परतलेल्या शीख भाविकांमध्ये मोठ्या संख्येने चिनी विषाणू बाधित रुग्ण सापडले आहेत. महाराष्ट्राच्या तुलनेत पंजाब सरकारने चीनी विषाणूचा संसर्ग रोखण्यात यश मिळवले आहे. मात्र महाराष्ट्रातून आलेल्या या बाधित भाविकांमुळे पंजाब सरकारच्या प्रयत्नांना हादरा बसला आहे. त्यामुळे पंजाबच्या खवळलेल्या कॉंग्रेस सरकारने या बेजबाबदार कृत्याबद्दल महाराष्ट्र सरकारला दूषणे दिली आहेत.
महाराष्ट्रातून एकूण 215 यात्रेकरू पंजाबात परतले आहेत. या यात्रेकरूंच्या कोरोना चाचणीबद्दल निष्काळजीपणा दाखवल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करणारे पत्र पंजाबचे आरोग्यमंत्री बलबीर सिंग सिद्धू यांनी महाराष्ट्र सरकारला पाठवले आहे. पंजाबी भाविक 40 दिवस महाराष्ट्रात अडकले होते. दरम्यान सुमारे 4 हजार पंजाबी यात्रेकरू महाराष्ट्रात अडकले आहेत.
दरम्यान महाराष्ट्र सरकारने पंजाब सरकारचा दावा फेटाळला आहे. मात्र नांदेडच्या स्थानिक अधिकार्यांचे म्हणणे मात्र राज्य सरकारचा दावा खोटे पाडणारे आहे.
नांदेडचे पोलिस अधिक्षक विजय कुमार यांच्या मते, नांदेडमधल्या गुरुद्वारातील स्वयंसेवकांची कोरोना चाचणी घेतली असता त्यात काहीजण चीनी विषाणूने बाधित असल्याचे आढळून आले. नांदेडचे सिव्हिल सर्जन डॉ. नीलकंठ भोसीकर यांनी सांगितले की, येथील गुरुद्वारामध्ये थांबलेल्या पंजाबच्या यात्रेकरुंचे स्वॅब (घशातील द्राव) नमूने घेण्यात आलेले नाहीत. याच बेजबाबदारपणामुळे पंजाबी यात्रेकरु महाराष्ट्रातून चीनी विषाणूचा संसर्ग घेऊन पंजाबात परतल्याचे मानले जात आहे.
नांदेडमधल्या तख्त हजूर साहिब सचखंड गुरुद्वारा आणि गुरुद्वारा लंगर साहिब येथून गेलेल्या यात्रेकरुंपैकी अनेकजण चीनी विषाणू बाधित सापडले आहेत. पंजाबचे वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन मंत्री ओ. पी. सोनी यांनी सांगितले की, महाराष्ट्रातून आलेल्या 137 भाविकांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. या सर्वांना आता क्वारंटाईन करण्यात आले असून सरकार त्यांची काळजी घेत आहे. दरम्यान पंजाबमधील एकूण कोरोनाबाधितांची संख्या जेमतेम सहाशेच्या घरात तर मृत्यूंची संख्या 20 आहे.
महाराष्ट्रातून परतलेले पंजाबी भाविक मोठ्या संख्येने बाधित आढळल्याने चिंता वाढली आहे. महाराष्ट्रातल्या सरकारने या भाविकांची नीट तपासणी केली असती तर त्यांचा प्रवास आणि पंजाबातील येणे थांबवता आले असते. पंजाबात कॉंग्रेस सरकार आहे. महाराष्ट्रातल्या सरकारमध्येही कॉंग्रेस भागीदार आहे. त्याहून महत्वाचे म्हणजे नांदेड शहर हा ज्येष्ठ कॉंग्रेस नेते आणि माजी मु्ख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा गड मानला जातो. हेच अशोक चव्हाण नांदेड कोरोनामुक्त कसा राखला, याबद्दल मराठी टीव्ही चॅनेल्सना मुलाखती देण्यात काही दिवसांपुर्वीपर्यंत दंग होते.