- नेटकरी पडले राऊत यांच्यावर तुटून
- लाईट बंद करू नका पण अफवाही पसरवू नका
विशेष प्रतिनिधी
मुंबई : देशवासीयांनी 9 मिनिटे दिवे बंद ठेवले तर विद्युत निर्मीती आणि वितरण व्यवस्थेवर गंभीर परिणाम होतील, असा दावा करणार्या महाराष्ट्राच्या ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्यावर तोंड लपवण्याची पाळी आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (ता. 5 एप्रिल) रात्री 9 वाजता 9 मिनिटे दिवे बंद करुन निरंजन, मेणबत्ती, विजेरी लावावी किंवा मोबाईलमधील फ्लॅश लाईट लावावी असे आवाहन केले आहे. चिनी विषाणूच्या आजाराशी सामना करणार्या देशवासीयांमध्ये एकात्मतेची भावना निर्माण होण्याच्या उद्देशाने मोदी यांनी ही कल्पना मांडली आहे. यावर राऊत यांनी टीका केली होती. मोदींचे हे आवाहन वीज क्षेत्राला अडचणीत आणणारे असल्याचा सूर राऊत यांनी लावला होता. मात्र राऊत यांचे म्हणणे बिनबुडाचे असल्याचे त्यांच्याच अखत्यारी येणार्या महावितरणने स्पष्ट केले आहे.
शनिवारी संध्याकाळपासूनच महाराष्ट्रातल्या लाखो ग्राहकांच्या मोबाईलवर महावितरणचा मेसेज येऊ लागला आहे. ”घरातील लाईट्स बंद केल्याने ‘ग्रिड फेल’ची अजिबात शक्यता नाही. वीज वापरातील असा चढउतार सहन करण्याची यंत्रणा महावितरणकडे आहे,” असा खुलासा चक्क महावितरणनेच केला आहे. पंतप्रधान महोदयांनी 5 एप्रिलला रात्री 9 ते 9.09 या कालावधीत घरगुती दिवे बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे. या कालावधीत इतर सर्व विद्यूत उपकरणे चालूच राहणार आहेत. ग्राहकांनी मुख्य स्वीच बंद करु नये. रस्त्यावरील दिवे, रुग्णालये, पोलिस स्टेशन, सार्वजनीक ठिकाणे येथील दिवे चालूच राहणार आहेत, असे ‘महावितरण’नेच सांगितले आहे.
महाविकास आघाडी सरकारमधील कॉंग्रेसचे ऊर्जामंत्री राऊत यांची भाषा एक आणि नेमकी त्यांच्याच खात्याची भूमिका मंत्र्याच्या पूर्ण विरोधी असे चित्र यातून पुढे आले आहे. त्यामुळे राऊत यांनी घाईने केलेल्या विधानावर नेटकरी तुटून पडले आहेत.
”ऊर्जामंत्र्यांनी ‘फेसबुक एक्स्पर्ट’ची पोस्ट वाचून दाखवायच्या ऐवजी किमान ‘महावितरण’मधील एक्स्पर्ट लोकांशी बोलायला हवं होतं,” असा टोला राऊत यांना लगावण्यात आला आहे. “तुम्हाला हवं तर दिवे लावू नका, मेणबत्त्या पेटवू नका, लाईट बंद करू नका पण अफवा पसरवू नका,” असा सल्ला उर्जा मंत्र्यांनाच देण्यात आला आहे. “एकाच कंट्रोलरखाली असलेली भारताची ‘वन नेशन वन ग्रीड’ ही जगात सर्वोत्कृष्ट.
ग्रीड सांभाळणाऱ्या पोस्कॉ व पॉवर ग्रीड कॉर्पोरेशनने स्पेशल प्रोटोकॉल लागू केला आहे. लोकांनी लाईट्स बंद केले, तर ग्रीडवर फक्त १५ गीगावॉट डिमांड कमी होईल, जी एकूण इंस्टॉल्ड कॅपॅसिटीच्या फक्त ४% असेल हे समजून घ्या,” असा उपदेश राऊत यांना करण्यात आला आहे. “अहो ते देशाचे पंतप्रधान आहेत. त्यांना तुमच्यापेक्षा जास्त कळतं. त्यांनीही विचार केलाच असेल,” असाही चिमटा राऊत यांना काढण्यात आला आहे. मंत्री राऊत यांच्या फेसबुक, ट्वीटर अकौंटवरही नेटकर्यांनी टिकेचा भडीमार केल्याचे दिसून येत आहे.