• Download App
    महाआघाडीला विसंवाद विषाणूचा संसर्ग... ठाकरेंबाबत राष्ट्रवादी व काँग्रेसची वाढती नाराजी | The Focus India

    महाआघाडीला विसंवाद विषाणूचा संसर्ग… ठाकरेंबाबत राष्ट्रवादी व काँग्रेसची वाढती नाराजी

    • दस्तुरखुद्द शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्याला घराबाहेर पडावे लागते, यावरूनच समजते की All is Not Well
    • ठाकरे यांच्या कार्यशैलीबद्दल राष्ट्रवादी व काँग्रेसमधील अनेकांचे प्रश्नचिन्ह. पृथ्वीराज चव्हाणांच्या थेट टीकेवरून समजते खदखद
    • मुंबईवर सर्वस्वी वर्चस्व असताना व शिवसैनिकांसारखी लढाऊ ताकत हातात असतानाही परिस्थिती नियंत्रणात आली नसल्याकडे वेधले जात आहे लक्ष

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : महाराष्ट्रातील तीन पक्षांच्या महाविकासआघाडीला विसंवाद विषाणूचा संसर्ग होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. चवथ्या लाॅकडाऊनच्या स्वरूपावरून आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजवर एकदाही परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी घराबाहेर न पडल्यावरून राष्ट्रवादी व काँग्रेसमध्ये नाराजी वाढत आहे. शेवटी स्वतः घराबाहेर पडून या सरकारचे भक्कम स्तंभ, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना “संदेश” दिला असल्याचे राजकीय वर्तुळात मानले जात आहे. माजी मुख्यमंत्री, काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी तर थेट उद्धव ठाकरे यांच्या प्रशासकीय कौशल्यावरच प्रश्नचिन्ह उभे केले आहे.

    चीनी व्हायरसचे संकट कोसळल्यानंतरच्या प्रारंभिक काळामध्ये मुख्यमंत्री ठाकरे यांची लोकप्रियता वाढली होती. आपल्या संवादांनी त्यांनी जनतेला आपलेसे केल्याचे मानले जात होते. मात्र, त्यानंतर महाराष्ट्रातील, विशेषतः मुंबईतील परिस्थिती हळूहळू हातातून निसटत चालली आणि ठाकरे यांच्याबद्दलचा प्रारंभिक आशावाद थोडासा धूसर होऊ लागला आहे. त्या पार्श्वभूमीवर महाआघाडी सरकारमधील विसंवाद, नाराजीनामा अधिक गडद होऊ लागल्याचे चित्र आहे.

    सुरूवात झाली ती ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना हळूहळू दूर ठेवण्यास सुरूवात केल्यापासून. त्यावरून विधानपरिषद निवडणुकीत गैरसमज व संशय वाढतच गेले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करणे भाग पडल्यानंतर विधानपरिषद निवडणूक कशीबशी जाहीर झाल्यानंतर काँग्रेसने सहावा उमेदवार जाहीर केल्यावर ठाकरे यांनी चक्क रूद्रावतारच धारण केला. ‘सहावा उमेदवार दिल्यास निवडणूकच लढविणार नाही,’ असा सज्जड दमच त्यांनी काँग्रेसला दिल्याचे प्रसिद्ध झाले. शेवटी काँग्रेसची कशीबशी समजूत काढली गेली. अगोदरच आपल्याला पहिल्यापासूनच दूर ठेवल्याने नाराज असलेले काँग्रेसचे नेते आणखीनच दूर गेले, पण परिस्थिती पाहता त्यांनी मौन बाळगणे पसंद केले. मुंबई आयुक्त पदावरून प्रवीण परदेशींना तडकाफडकी दूर करणे, अनेकांना विशेषतः राष्ट्रवादीला रूचलेले नाही.

    या सगळ्या पार्श्वभूमीवर ठाकरे यांच्या कार्यपद्धतीबाबत राष्ट्रवादी व काँग्रेसमध्ये नाराजी वाढते आहे. ठाकरे यांचे मुंबईवर सर्वस्वी वर्चस्व असताना, शिवसेनेसारखी लढाऊ ताकत हातात असताना मुंबईतील परिस्थिती नियंत्रणात ठेवता आलेली नाही, याकडे अनेकजण लक्ष वेधत आहेत. “मुंबईतील वेग पोटात गोळा आणणारा आहे. मुख्यमंत्री अजून एकदाही घराबाहेर पडलेले नाहीत, हे काही चांगले चित्र नाही. जनतेचा विश्वास वाढविणारे नाही. डाॅक्टर- नर्सेस- पोलिसांच्या पाठीवर शाबासकीची थाप कोण देणार? कोण यंत्रणेतील त्रुटी दूर करणार? मुंबईत ते बाहेर प़डले नाहीत, तर मग पुणे, औरंगाबाद, मालेगाव, नागपूरला कधी भेटी देणार?” अशी नाराजी राष्ट्रवादीच्या एका नेत्याने नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर व्यक्त केली. उद्धव ठाकरेंना संदेश देण्यासाठी स्वतः शेवटी पवार साहेबांना घराबाहेर पडावे लागले, अशी खंतही त्याने व्यक्त केली.

    अशीच नाराजी चवथ्या लाॅकडाऊनवरून आहे. चवथ्या लाॅकडाऊनमध्ये मुंबई- पुणे- नाशिक हा पट्टा आणि नागपूरवगळता अन्य जिल्ह्यांमध्ये भरीव सवलती द्यायला हव्यात आणि आर्थिक हालचालींना गती दिली पाहिजे, असे राष्ट्रवादीला वाटते. पण ठाकरे यांच्या “जाणीवा मुंबईपलीकडच्या” नसल्याने ते कोणताही धोका स्वीकारायला तयार नाहीत. परिणामी तुरळक रूग्ण असतानाही बहुतेक जिल्हे आजही ठप्प आहेत. फारसा प्रादुर्भाव नसलेल्या ठिकाणचा लाॅकडाऊन आता उठवा, असे राष्ट्रवादीची आग्रही मागणी मान्य होऊ शकलेली नाही. त्यावरून ठाकरे यांच्यावर नाराजी आहे.

    या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ठाकरे यांच्यावर केलेल्या थेट टीकेने अनेकांच्या भुवया उंचावल्या. त्यांच्या प्रशासकीय वकुबावरच चव्हाणांनी बोट ठेवले. या सगळ्या गोष्टींमुळे महाआघाडीतील विसंवाद वाढतो आहे.

    Related posts

    नड्डांवर बॅनर्जींची मानभावी “ममता”; कोरोनातून बरे होण्यासाठी दिल्या शुभेच्छा

    पवारांना संभाजीराजेंच्या वाढदिवसाच्या “सारथी” शुभेच्छा

    मोदी सरकारविरोधातील संघर्षात ममतांचा संघराज्य व्यवस्थेलाच धक्का