मुंबईतील धारावीतील मजूर रेल्वे गाडी रद्द झाल्याने आक्रोश करत रस्त्यावर आले होते. मात्र, याच वेळी केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने राज्य सरकारच्या मागणीप्रमाणे रेल्वे गाड्या तयार ठेवल्या होत्या. मात्र राज्य सरकारने मजुरांची संख्याच चुकवल्याने अनेक रेल्वे गाड्या रिकाम्या परत फिरल्या. त्याचवेळी नियोजनाचा अभाव असल्याने रेल्वे स्थानकांबाहेरील स्थलांतरीतांनाही त्रास सहन करावा लागला.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुंबईतील धारावीतील मजूर रेल्वे गाडी रद्द झाल्याने आक्रोश करत रस्त्यावर आले होते. मात्र, त्याच वेळी तब्बल ५० रेल्वे गाड्या त्यांना घेऊन जाण्यासाठी तयार होत्या. राज्य सरकारने योग्य नियोजन केले असते तर मजुरांना रस्त्यावर येण्याची वेळ आली नसती, असे रेल्वेकडून सांगण्यात येत आहे.
रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी रेल्वेगाड्या उपलब्ध करून देऊन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना चोख उत्तर दिले. मात्र, राज्य सरकारला दोन दिवसानंतरही मजुरांची यादी करता आली नाही. त्यामुळे रेल्वे विभागाने ७४ रेल्वे उपलब्ध करून दिल्या असतानाही केवळ २४ गाड्याच मजुरांना घेऊन जाऊ शकल्या.
महाराष्ट्रातील परप्रांतीय कामगारांसाठी कामगार विशेष ट्रेन चालवण्याबाबत रेल्वेमंत्री पियुष गोयल आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यात 2 दिवसांपासून ट्विटर वॉर सुरू आहे. गोयल यांनी मंगळवारी ठाकरे सरकारवर व्यवस्था न केल्याचा आरोप केला आहे. रेल्वेमंत्री म्हणाले की, रेल्वे कर्मचाऱ्यांनी रात्रभर परिश्रम करून व्यवस्था केली.
आम्ही महाराष्ट्राला 145 रेल्वे गाड्या दिल्या. प्रत्येक रेल्वेगाडीविषयी राज्य सरकारला माहिती दिली. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 74 गाड्या रवाना होणार होत्या. मात्र दुपारी 12.30 पर्यंत कोणीच प्रवासी बसला नाही. सरकार या 74 पैकी केवळ 24 गाड्यांसाठी प्रवाशी पाठवू शकले. महाराष्ट्रात अजूनही 50 रेल्वे गाड्या उभ्या आहेत. फक्त 13 गाड्या मजुरांना घेऊन त्यांच्या राज्यांपर्यंत पोहचल्या.
मी महाराष्ट्र सरकारला विनंती करतो की संकटग्रस्त स्थलांतरीत मजुरांना त्यांच्या घरी पोहचण्यासाठी संपूर्ण सहकार्य करावे. प्रवाशांना वेळेवर स्टेशनवर आणणे आवश्यक आहे, याचा परिणाम संपूर्ण नेटवर्क आणि योजनेवर होईल, अशी भीती पियुष गोयल यांनी व्यक्त केली