विशेष प्रतिनिधी
पुणे : महाराष्ट्रातील उध्दव ठाकरे यांचे सरकार दुकाने उघडण्याच्या वेळांमध्ये सातत्याने बदल करत आहे. त्यावरून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कडक शब्दांत टीका करत हा थिल्लरपणा असल्याचे म्हटले आहे.
चीनी व्हायरसचा प्रादुर्भाव वाढू लागल्यानंतर लॉकडाऊन सुरू झाला. त्यानंतर महाराष्ट्रात आत्तापर्यंत दुकाने उघडी ठेवण्याच्या वेळेत अनेक बदल करण्यात आले. सुरूवातीला महाराष्ट्र सरकारने दुकाने २४ तास दुकाने उघडी ठेवावीत असे आदेश काढले होते. त्यानंतर त्यामध्ये सातत्याने बदल करण्यात आले.
राज ठाकरे यांनी एका खासगी वृत्तवाहिनीवर बोलताना यावर टीका केली. ठाकरे म्हणाले, तुम्ही दोन तासं दुकानं कसली उघडी ठेवता आहात? दुकानं दिवसभर उघडी ठेवा, ज्या लोकांना जेव्हा जायचं आहे तेव्हा जातील, रांगेत उभे राहतील, अंतर ठेवून उभे राहतील. मात्र तुम्ही दोन तासंच दुकानं उघडी ठेवाल तेव्हा तिकडं ज्यावेळी झुंबड होते, तेव्हा तुम्ही म्हणतात की कुणी इथं नियमांचं पालन करत नाही. आता म्हणता आम्ही दुकानं बंद करतो, हा कुठचा थिल्लरपणा?
राज ठाकरे यांनी सुरूवातीला उध्दव ठाकरे यांच्या कामगिरीबाबत समाधान व्यक्त केले होते. त्याबाबत ते म्हणाले, सुरूवातीला काही गोष्टी बऱ्या वाटल्या पण आता काही गोष्टींचे निर्णय ठामपणे घेतले नाहीतर ते बरोबर होणार नाही.
आता लॉकडाउनचं सर्वात मोठं संकट आहे, हे लॉकडाउन तुम्ही कधी काढणार आहात? कसं काढणार आहात? हे तुम्ही लोकांसमोर येऊन सांगणं आता आवश्यक आहे. ज्या प्रकारे तुम्ही एक दिवशी तुम्ही अचानक येता व सांगता उद्यापासून बंद. बंद म्हणजे काय? तुम्ही यासाठी चार-सहा दिवस देणं गरजेचं होतं. लोकांना कळणं गरजेचं होतं. अशी परिस्थिती असताना मग आता तुम्ही लॉकडाउन काढणार कसा? कसं जायचं पुढे, काय होणार आहे पुढे? या गोष्टी सरकरानं समोर येऊन सांगणं गरजेचं आहे.
प्रत्येक वेळी मुख्यमंत्र्यांनीच येऊन सांगितलं पाहिजे असं गरजेचं नाही, इतरही काही मंत्री आहेत, त्यांनी देखील पुढे येऊन याबाबत सांगायला हवं.