- हिंदू देवस्थांनाच्या संपत्तीवर वायएसआर सरकारचा डोळा : भाजपचा गंभीर आरोप
विशेष प्रतिनिधी
हैदराबाद : तिरुमला तिरुपती बालाजी देवस्थानाच्या तमिळनाडू व अन्य राज्यांमध्ये असलेल्या ५० वेगवेगळ्या मालमत्ता देवस्थान बोर्डाने लिलावासाठी खुल्या केल्या आहेत. प्रदेश भाजपने याला कडाडून विरोध केला असून हळू हळू हिंदू देवस्थानांच्या मालमत्ता आपल्या बगलबच्च्यांच्या ताब्यात देण्याचा मुख्यमंत्री वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांचा डाव असल्याचे म्हटले आहे.
२९ शेकजमिनी व मालमत्ता यांच्या लिलावाची नोटीस निघून लिलाव प्रक्रिया सुरू झाली आहे. देवस्थानाच्या बोर्डाने मात्र या मालमत्ता लिलावाचे समर्थन केले आहे. ज्या मालमत्ता, जमिनी, निवासस्थाने देवस्थानच्या मूळ ठिकाणापासून दूर आहेत. ज्यांची देखभाल करणे अवघड बनले आहे अशाच मालमत्ता लिलावासाठी काढण्यात आल्याचे बोर्डाचे सध्याचे चेअरमन व्ही मोहनराव रेड्डी यांचे म्हणणे आहे.
प्रत्यक्षात या लिलाव प्रक्रियेत पारदर्शकता नाही. लिलावात वायएसआर जगनमोहन रेड्डी समर्थक कार्यकर्तेच बोली लावणार आणि त्या चढत्या किंवा उतरत्या ठेवणार आणि अत्यंत कमी किमतीत त्या विकत घेणार असा हा मामला आहे. याविषयी भाजप प्रदेशाध्यक्ष कन्ना लक्ष्मीनारायण आवाज उठवला आहे.
शिवाचलम देवस्थानाच्या जमिनी, मालमत्ता अशाच लिलावात काढण्यात आल्या. त्या नियमबाह्य पद्धतीने खासगी संस्था, व्यक्तींच्या नावावर करण्यात आल्या. यात गैरव्यवहार झाल्याचे उघड झाले. तरी आंध्र सरकारने अद्याप संबंधित जमिनी व मालमत्तांची मालकी शिवाचलम देवस्थानाच्या नावावर केली नाही, या वस्तुस्थितीवर देखील लक्ष्मीनारायण यांनी प्रकाश टाकला.
तेलुगु देशमचे नेते आणि तिरुमला तिरुपती देवस्थान बोर्डाचे माजी सदस्य बोंडा उमामहेश्वर राव यांनी देखील भाजपच्या सूरात सूर मिसळला आहे. हिंदू देवस्थानांच्या मालमत्ता मोडीत काढण्याचा वायएसआर रेड्डी सरकारचा हा डाव असल्याचे त्यांनी म्हटले आहे.