विशेष प्रतिनिधी
मुंबई : दिल्लीत निजामुद्दीनला तबलीग जमातच्यावतीने मरकजचे आयोजन झालं. हजारो लोक तिथे जमले. परत आल्यावर आपापल्या गावात गेले. यातल्या काही लोकांनी कोरोनाच्या रोगाला बरोबर घेऊन गेल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे साहजिकच त्यानंतर हा रोग फैलावतो का काय, असे चित्र ठिकठिकाणी दिसते, या शब्दात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी तबलीग जमात या मुस्लिम संघटनेला फटकारले.
तबलीगने निजामुद्दीनचा सोहळा टाळायला पाहिजे होता. तो टाळला नाही याची किंमत सगळ्यांना मोजावी लागेल. पुन्हा असे घडू नये, असे पवारांनी सुनावले. गुरुवारी (दि. 2) फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून पवारांनी संपर्क साधला. त्यावेळी ते बोलत होते. पवार म्हणाले, की एका बाजूला संबंध जग चिंतेत आहे. कोरोनानं जाचलेलं आहे. त्याचा प्रादुर्भाव वाढतोय. अनेक सूचना यापुर्वी केल्या गेल्या. पंतप्रधानांनी केल्या. मुख्यमंत्र्यांनी केल्या. 90 टक्के लोक या सूचनांची अंमलबजावणी करतात. आजची स्थिती लक्षात घेऊन काही पथ्ये पाळलीच पाहिजेत.
आणखी दोन तारखा आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत, असे पवार म्हणाले. 8 एप्रिलला मुस्लिम मोठ्या प्रमाणात एकत्र येतात आणि कब्रस्थानात जातात. तिथे जाऊन हयात नाहीत त्यांचे स्मरण करतात. हयात नसलेल्यांचे स्मरण जरुर करा पण घरात करा. नमाज घरी पढा. एकत्रित कब्रस्थानात जाण्याचा हा प्रसंग नाही. 8 एप्रिलला निजामुद्दीला जे घडलं ते घडू देणार नाही असा निश्चय करा, अशी सूचना पवारांनी मुस्लिमांना केली. डॉ. आंबेडकरांची जयंती 14 एप्रिलला आहे. त्याचा सोहळा महिना-दीड महिना आपण साजरा करत असतो. यावेळी हा सोहळा साजरा करण्याचा प्रसंग आहे का याचा विचार गांभिर्याने केला पाहिजे, असेही पवार म्हणाले. वेळी या कार्यक्रमाला पुढे नेणे शक्य आहे का याचा विचार करण्याची वेळ आहे. बाबासाहेबांचे स्मरण करु पण कालावधीत बदल करण्याचा विचार जाणकारांनी करावा, असेही पवारांनी स्पष्ट केले.
अजूनही लोक दिसतात रस्त्यांवर आल्यामुळे रुग्णांची संख्या वाढत असल्याबद्दल पवारांनी खेद व्यक्त केला. ते म्हणाले की, दैनंदिन किराणा माल, भाजीपाल्याची गरज आहे. परंतु, या राज्यात-देशात फळ-भाजीपाल्याची कमतरता नाही. सरकारने किराणा दुकाने उघडण्याची संमती दिली आहे. उपलब्धता असताना मिळणारच नाही, असे समजून साठेबाजी करणे किंवा गर्दी करणे योग्य नाही. सरकारने, पोलिस दलाने ज्या सूचना दिल्यात, त्या तंतोतंत पाळण्याची भूमिका घेतली पाहिजे. जे अंमलबजावणी करत नाहीत त्याची दखल पोलिसांना नाईलाजाने घ्यावी लागते. काही ठिकाणी पोलिसांशी संघर्ष केला गेला. डॉक्टर, नर्स, पोलिस दलातील घटक धोका पत्करून अहोरात्र काम करतात. त्यांचा सन्मान करा. त्यांच्याशी वाद नको. वैद्यकीय यंत्रणेला पूर्ण सहकार्य करा, असे आवाहन पवारांनी केले.