विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : डॉक्टर, वैद्यकीय कर्मचाऱ्यांवरील वाढते हल्ले कठोरपणे मोडून काढण्यासाठी केंद्र सरकारने १८९७ च्या साथीच्या रोग प्रतिबंधक कायद्यात अध्यादेश काढून सुधारणा केली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर ताबडतोब नवा कायदा अमलात येईल.
- डॉक्टर, वैद्यकीय, आरोग्य कर्मचाऱ्यांवरील हल्ले आता दखलपात्र आणि अजामीनपात्र गुन्हे मानले जातील. गुन्हेगारांना जामीन मिळणार नाही.
- हल्ल्यांची चौकशी, तपासणी ३० दिवसांत पूर्ण करावी लागेल. कोर्टात खटला दाखल करून एका वर्षाच्या आत निकाल लावावा लागेल.
- गुन्ह्याच्या गंभीर स्वरूपानुसार हल्लेखोरांना ६ महिने ते ७ वर्षांपर्यंतच्या तुरुंगवासाची शिक्षा करण्यात येईल. १ ते ५ लाख रुपयांपर्यंतचा दंडही ठोठावण्यात येईल.
- हल्ल्यादरम्यान डॉक्टर, वैद्यकीय, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या वाहनांचे नुकसान झाले, मालमत्तेचे, दवाखाना, हॉस्पिटल प्रॉपर्टीचे नुकसान झाले तर संंबधित मालाचा आणि मालमतेच्या बाजार मूल्याच्या दुप्पट रक्कम हल्लेखोरांकडून वसूल करण्यात येईल.
- कोविड १९ चे संकट संपल्यानंतरही नवा कायदा देशात लागू राहील.
डॉक्टर, वैद्यकीय, आरोग्य कर्मचाऱ्यांवरील हल्ले आता कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाहीत. त्यांच्या सुरक्षेशी कोणत्याही प्रकारची तडजोड केली जाणार नाही, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून दिली आहे.