• Download App
    ट्रम्प यांनी मानले भारताचे, भारतीयांचे आणि मोदींचे आभार; अमेरिका भारताची मदत कधीच विसरणार नाही...!! | The Focus India

    ट्रम्प यांनी मानले भारताचे, भारतीयांचे आणि मोदींचे आभार; अमेरिका भारताची मदत कधीच विसरणार नाही…!!

    विशेष प्रतिनिधी

    वॉशिंग्टन : “चीनी व्हायरस कोविड १९ च्या विरोधातील लढाईत योगदान दिल्याबद्दल मी भारत, भारतीय नागरिक आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानतो”, असे ट्विट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले आहे.
    “मी अमेरिकन नागरिकांसाठी भारताकडून हायड्रोक्सी क्लोरोक्वाइनचे २ कोटी ९० लाख डोस आणू शकलो. या अत्यंत नाजूक काळात भारताने या औषधाच्या निर्यातीला परवानगी दिली. मी त्यांचे आणि अतुलनीय नेतृत्व क्षमतेच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानतो. मानवतेसाठी त्यांनी केलेले योगदान अमेरिका कधीच विसरणार नाही,” असे ट्विट ट्रम्प यांनी केले.
    “भारताने हायड्रोक्सी क्लोरोक्वाइनच्या निर्यातीला परवानगी नाकारली तर अमेरिका प्रत्युत्तर देईल,” या ट्रम्प यांच्या कथित धमकीनंतर दोनच दिवसांनी आलेले हे ट्विट वेगळीच राजकीय कहाणी सांगून जाते. तत्पूर्वी फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प म्हणाले होते, “मी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी बोललो. त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. कोविड १९ च्या प्रकोपात भारतालाच औषधाची मोठी गरज आहे म्हणून त्यांनी निर्यातीला निर्बंध घातले होते. प्रचंड लोकसंख्येच्या भारताने कोविड १९ ला केलेला अटकाव खरोखर प्रशंसा करण्यासारखाच आहे.”

    भारत हायड्रोक्सी क्लोरोक्वाइनचा जगातील सर्वांत मोठा उत्पादक आहे. प्रत्येकी २०० एमजीच्या २० कोटी गोळ्या तयार करण्याची भारताची क्षमता आहे. कोविड १९ च्या प्रतिबंधासाठी हे उपयुक्त औषध असल्याचा निर्वाळा अमेरिका आणि भारताच्या मेडिकल कौन्सिलनी दिला आहे. भारतातही कोविड १९ चा वाढता प्रकोप पाहता देशातच या औषधाची अधिक गरज आहे. या दृष्टीने भारताने काही दिवसांपूर्वी त्याच्या निर्यातीवर बंधने आणली होती. परंतु, ब्राझिल आणि अमेरिकेची गरज लक्षात घेऊन त्यात बदल करण्यात आले. त्यामुळे दोन्ही देशांना औषधाचे डोस उपलब्ध होऊ शकले. या बद्दलच ट्रम्प यांनी ट्विट करून भारत, भारतीय आणि नरेंद्र मोदींचे आभार मानले.

    Related posts

    नड्डांवर बॅनर्जींची मानभावी “ममता”; कोरोनातून बरे होण्यासाठी दिल्या शुभेच्छा

    पवारांना संभाजीराजेंच्या वाढदिवसाच्या “सारथी” शुभेच्छा

    मोदी सरकारविरोधातील संघर्षात ममतांचा संघराज्य व्यवस्थेलाच धक्का