• Download App
    चिनी विषाणूला हरवणाऱ्या भारतीयांच्या संख्येत वाढ, कोरोना बळींचे प्रमाण भारतात 3.2 टक्के | The Focus India

    चिनी विषाणूला हरवणाऱ्या भारतीयांच्या संख्येत वाढ, कोरोना बळींचे प्रमाण भारतात 3.2 टक्के

    लॉकडाऊनचा चांगला परिणाम देशभरात दिसून येऊ लागला आहे. चिनी विषाणूचा संसर्ग झाल्यानंतर त्यातून बरे होणाऱ्यांची संख्या देशात वाढू लागली आहे. त्याचबरोबर बळींच्या संख्येतही वाढ होत नसल्याचे सकारात्मक चित्र पाहण्यास मिळत आहे.


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली :   संपूर्ण जगभर कहर माजवलेल्या चिनी विषाणूला पराभूत करण्यासाठी 130 कोटी लोकसंख्येच्या देशात लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्याचा मोठा धाडसी निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला. एकीकडे अमेरिका, इटली, स्पेन, फ्रान्स, इंग्लंड हे प्रगत आणि श्रीमंत देश कोरोना विषाणूपुढे नांगी टाकत असताना भारत मात्र नेटाने उभा आहे. लॉकडाऊनमुळे चिनी विषाणूच्या प्रादुर्भावालाही खीळ बसली आहे. कोरोना बळींच्या संख्येत भीतीदायक वाढ होताना दिसत नाहीए. तसेच चिनी विषाणूचा संसर्ग झाल्यानंतरही त्यातून बरे होऊन जाणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे.

    आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार गेल्या 24 तासांत देशात 1 हजार 334 नवे रुग्ण आढळले. यामुळे देशातल्या एकूण कोरोनाबाधीतांची संख्या वाढून 15,712 झाली आहे. चिनी विषाणूचा संसर्ग झाल्यानंतर त्यातून पूर्ण बरे होणाऱ्यांची संख्या देशात 2 हजार 230 आहे. संसर्ग झाल्यानंतर बरे होण्याचे प्रमाण देशात 14.2 टक्के आहे. शुक्रवारी हेच प्रमाण 13 टक्के तर शनिवारी 13.85 टक्के होते, हे विशेष. सक्रीय कोरोनाबाधीतांची सध्याची संख्या देशात 12 हजार 974 आहे. तर कोरोना बळींची संख्या 507 आहे. चिनी विषाणूमुळे मृत्यू होण्याचे प्रमाण 3.2 टक्के आहे.

    आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अगरवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, वयस्कर माणसांचे आणि गंभीर आजार असणाऱ्यांचे चिनी विषाणूला बळी पडण्याचे प्रमाण जास्त आहे. चिनी विषाणूची लागण झालेल्यांपैकी 14.4 टक्के लोक वय वर्षे 45 च्या आतले आहेत. 45 ते 60 या वयोगटातील कोरोनाबाधीत 10.3 टक्के आहेत तर 33.1 टक्के कोरोनाबाधीत 60 ते 75 या वयोगटातले आहेत. तर बळी पडलेल्यांपैकी 75.3 टक्के रुग्ण हे साठीच्यापुढचे होते. सर्वात महत्वाचे म्हणजे एकूण बळींपैकी 83 टक्के लोकांना इतर काही ना काही गंभीर आजार किंवा व्याधी होत्या.

    कोरोनासंबंधी महत्वाचे मुद्दे –
    1) सोशल डिस्टन्सिंगचे नियम सर्व कुटुंबानी काटेकोरपणे पाळावेत. ज्येष्ठ नागरिकांना कोरोना बाधीत किंवा क्वारंटाईन केलेल्या व्यक्तींपासून दूर ठेवा, असे आवाहन आरोग्य मंत्रालयाने केले आहे.
    2) देशातील सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात 3 हजार 651 इतके आहेत. तसेच कोरोना बळींची सर्वाधिक संख्यादेखील महाराष्ट्रात 211 इतकी आहे.
    3) मध्यप्रदेशात 1404 रुग्णांची नोंद झाली असून 70 जणांचा बळी गेला आहे. गुजरातमध्ये 1376 रुग्णांची नोंद असून बळींची संख्या 53 आहे.
    4) इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर)च्या माहितीनुसार शनिवारपर्यंत 3.72 लाख नमुन्यांची चाचणी देशात घेण्यात आली आहे.
    5) लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर देशांतर्गत किंवा आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणांचा कोणताही निर्णय नागरी उड्डयन मंत्रालयाने घेतलेला नाही. सरकारने लॉकडाऊन उठवण्यासंदर्भातला निर्णय घेतल्यानंतरच विमान कंपन्यांनी बुकींग सुरु करावे, अशी सूचना मंत्रालयाने केली आहे.

    Related posts

    नड्डांवर बॅनर्जींची मानभावी “ममता”; कोरोनातून बरे होण्यासाठी दिल्या शुभेच्छा

    पवारांना संभाजीराजेंच्या वाढदिवसाच्या “सारथी” शुभेच्छा

    मोदी सरकारविरोधातील संघर्षात ममतांचा संघराज्य व्यवस्थेलाच धक्का