विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्यात कोरोनाचे थैमान चालू असताना लॉकडाऊनच्या काळात घोटाळे बहाद्दर कपिल आणि धीरज वाधवान बंधूंची महाबळेश्वरची ट्रीप नेमकी कोणाच्या आशीर्वादाने घडली….. “मातोश्री”च्या की “सिल्वर ओक”च्या…?? अशी चर्चा काल रात्रीपासून रंगात आली आहे. वाधवान बंधू हे डीएचएफएल आणि येस बँकेच्या घोटाळ्यांमधील संशयित आहेत. ते दोघेही कुटुंबीय आणि मित्र अशा २३ जणांबरोबर लॉकडाऊनच्या काळात महाबळेश्वरची ट्रीप मारतात. त्यांच्याजवळ खंडाळा ते महाबळेश्वर प्रवासाच्या परवानगीचे पत्र असते. त्यावर राज्याच्या गृह विभागाचे प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांची सही आहे. गुप्ता यांनी पत्रात वाधवान बंधूंना फँमिली फ्रेंड असे संबोधले आहे. त्यांना कुटुंबाच्या तातडीच्या कामासाठी कुटुबीयांसह जाण्याची गरज असल्याने परवानगी देण्यात आल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. ही सर्व प्रवास प्रक्रिया संशयाच्या भोवऱ्यात अडकली आहे.
कोरोना लॉकडाऊनच्या काळात सामान्य माणूस जीवनावश्यक वस्तूंसाठी झगडत आहे. त्याचवेळी वाधवान बंधूंना कुटुंबीयांसह व्हीआयपी ट्रीटमेंट दिल्याचा प्रकार धक्कादायक आहे. अभिनव गुप्तांनी हे पत्र स्वत:हून दिले आहे की कोणाच्या सांगण्यावरून दिले आहे, याचीही चौकशी करण्याची गरज व्यक्त होत अाहे. लॉकडाऊनच्या काळात वाधवान कुटुंबीयांचे महाबळेश्वर येथे असे कोणते तातडीचे कौटुंबिक काम होते, याचा खुलासा अद्याप झालेला नाही. गृहमंत्री अनिल देशमुखांनी मात्र चौकशीचे आदेश देऊन आपला या प्रकरणाशी संबंध नसल्याचे दर्शविले आहे. या प्रकरणाचे धागेदोरे कोणापर्यंत पोहोचतात, हे लक्षात घेऊन चौकशीचे आदेश देत देशमुखांनी आपले हात दगडाखालून काढून घेतल्याचेही बोलले जात आहे.
घोटाळे बहाद्दर वाधवान बंधूंच्या महाबळेश्वर ट्रीपच्या निमित्ताने मुंबईच्या जेजे हत्याकांडातील आरोपी शर्मा बंधूंच्या विशेष विमान प्रवासाची आठवण महाराष्ट्राला होत आहे.