रविवारी मध्यरात्री आव्हाड यांच्या पोलीस शरीररक्षकांसह अन्य काही जणांनी करमुसे यांना त्यांच्या राहत्या घरातुन उचलून आव्हाडांच्या ठाण्यातील बंगल्यावर नेले. त्या ठिकाणी आव्हाड यांच्यासमोर त्यांना अनेकांनी मिळून मारहाण केली. वर्तकनगर पोलीस ठाण्यात केली ही तक्रार करण्यात आली आहे. पोलिसांनी अनोळखी व्यक्तींविरोधात संचारबंदीसह भा.द.वी.365, 324, 506 (2) या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभुमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 5 एप्रिलच्या रात्री 9 वाजता 9 मिनिटे विजेचे दिवे बंद करुन दिवे लावण्याचे आवाहन देशवासियांना केले होते. आव्हाड यांनी या आवाहनाविरोधातली प्रतिक्रिया व्यक्त केली होती. त्यावर या अभियंत्या तरुणाने आव्हाड यांच्या विरोधात फेसबुकवर प्रतिक्रीया व्यक्त केली. याचा राग मनांत धरुन 5 एप्रिलच्या रात्री 11:50 च्या सुमारास दोन गणवेषातील पोलिस आणि दोघे साध्या वेषातील पोलीस अभियंता तरुणाच्या घरी आले. तुम्हाला पोलिस स्टेशनला बोलवले असल्याचे सांगून त्यांना बळजबरीने स्कॉर्पिओ व इनोव्हा गाडीतुन सायबर गुन्हे शाखा व पोलीस ठाण्याऐवजी थेट आव्हाड यांच्या विवियाना माॅलमागील नाथ बंगल्यावर नेण्यात आले. या दोन्ही वाहनात दहा-अकरा लोक होते. तक्रारदाराने विचारल्यावर गाडीतील व्यक्तीनी आव्हाड साहेबांच्या बंगल्यावर नेत असल्याचे सांगितले. मध्यरात्रीनंतर बंगल्यात उपस्थित अनेकांनी पोलीसांकडील फायबर काठी तुटेपर्यत मारहाण केली. काठी तुटल्यावर वेताचा बांबु, लोखंडी पाईप आणि कंबरेच्या पट्याने चक्कर येईपर्यंत अमानुष मारहाण केली.
मारहाण होताना स्वतः जितेंद्र आव्हाड हे त्या ठिकाणी उपस्थित होते. त्यांची माफीदेखील मागीतली तरीही बेदम मारहाण करण्यात आली, अशी तक्रार संबंधित तरुणाने केली आहे. मला फेसबुकवरील संबंधित पोस्ट डिलीट करायला लावली. त्यानंतर ”मी ही पोस्ट चुकून पोस्ट केली. त्या बद्दल माफी मागतो,” असा व्हिडिओ माझ्याकडून रेकाॅर्ड करुन घेण्यात आला. अशी तक्रार या अभियंता तरुणाने वर्तकनगर पोलिस ठाण्यात दिली आहे. या अभियंत्याविरोधातही सोशल मिडीयात आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.