विशेष प्रतिनिधी
मुंबई : “महाराष्ट्र सरकारवर व त्याच्या अधिकार्यांवर डाॅक्टरांच्या काही व्हाट््स ग्रुप्सवर अयोग्य भाषेमध्ये टीका टिप्पणी केली जात आहे. त्यांना खबरदारी घ्यायला सांगा…,” अशी सक्त ताकीद महाराष्ट्र पोलिसांनी इंडियन मेडिकल असोसिएशन्स (आय़एमए) या डाॅक्टरांच्या संघटनेला दिली आहे. सायबर पोलिसांच्या या खबरदारी घेण्याची सूचनेने अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येत असल्याची चर्चा डाॅक्टरांच्या अनेक ग्रुपमध्ये चालू झाली आहे.
‘आयएमए’चे महाराष्ट्रचे अध्यक्ष डाॅ. अविनाश भोंडवे आणि राज्य सचिव डाॅ. पंकज भांडारकर यांनी यासंदर्भातील पत्र सर्व डाॅक्टरांना पाठविले आहे. त्यामध्ये महाराष्ट्र पोलिसातील एक सायबर अधिकारयाने ‘आयएमए’ला राज्य सरकारवर अयोग्य भाषेत टीका न करण्याची ताकीद दिल्याचे नमूद केले आहे. हे पत्र सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहे.
डाॅ. भोंडवे व डाॅ. भांडारकर यांनी लिहिलेले हे पत्र पुढीलप्रमाणे आहे :
“…डाॅक्टरांच्या काही व्हाटसअप ग्रुप्सवर महाराष्ट्र सरकार व त्याच्या अधिकार्यांविरुद्ध टीका करणार्या पोस्ट केल्या जात असल्याचे सायबर पोलिस अधिकारयाने कळविले आहे. पोलिसांनी डाॅक्टरांना पुढील खबरदारीच्या सूचना पाळण्यास सांगितले आहे…
- डाॅक्टरांच्या व्हाटसअप ग्रुप्स वर चर्चा व संवाद झाला पाहिजे. सरकारच्या निर्णयाविरुद्ध तिथे अयोग्य टिप्पणी करता कामा नये.
- डाॅक्टर्स काही निर्णय़ांबाबत टिप्पणी करू शकतात: पण त्यासाठी अपमानास्पद भाषा (‘ऑफेडिंग लॅग्वेंज’) वापरता कामा नये.
सबब, आयएमएचे सदस्य हे समाजातील प्रमुख घटक (‘क्रीम ऑफ सोसायटी’) असून त्यांनी अशा कारवायांमध्ये सहभागी होता कामा नये. कोविड १९विरुद्ध आपण मोहीम चालूच ठेवू या…”
सायबर पोलिसांच्या या खबरदारी घेण्याची सूचनेने अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येत असल्याची चर्चा डाॅक्टरांच्या अनेक ग्रुपमध्ये चालू झाली आहे. तबलिगी जमातीबद्दल टिप्पणी केल्याप्रकरणी औरंगाबादमधील एका डाॅक्टरावर गुन्हा दाखल झालेला आहे.