• Download App
    कोरोना तपासणीच्या निकषांमध्ये मुंबई महापालिकेचे गौडबंगाली बदल...!! | The Focus India

    कोरोना तपासणीच्या निकषांमध्ये मुंबई महापालिकेचे गौडबंगाली बदल…!!

    •  रुग्णसंख्या दिसणार कमी, पण कोरोना फैलावाचा धोका मात्र कायम
    •  फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून उघड केला डाव
    •  कोरोना तपासणीत ‘आयसीएमआर’चेच निकष कायम ठेवण्याची मागणी

    विशेष  प्रतिनिधी

    मुंबई : चीनी व्हायरस कोविड १९ च्या तपासणीचे निकष परस्पर बदलून मुंबईतील कोरोनाग्रस्तांची संख्या कृत्रिमरीत्या कमी करण्याचा मुंबई महापालिकेचा डाव विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उघडकीस आणला आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या कमी दिसली तरी त्याच्या फैलावाचा धोका कायम राहतो, याकडे त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे लक्ष वेधले आहे.

    कोरोनाच्या तपासणीचे निकष इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चप्रमाणे (आयसीएमआर) न ठेवता मुंबई महापालिकेने त्यात बदल केल्यामुळे कोरोनाग्रस्तांची संख्या कृत्रिमरित्या कमी दिसेल पण प्रत्यक्षात कोरोना फैलावाचा धोका आणखी वाढू शकतो, असा इशाराच फडणवीस यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना पत्र पाठवून दिला आहे.

    कोरोनाच्या तपासणी निकषात बदल करू नयेत अशी  विनंतीही त्यांनी ठाकरे यांना केली आहे. ‘आयसीएमआर’ने कोरोना चाचणीबाबत स्पष्ट निर्देश दिले आहेत. आतापर्यंत एकूण ४ निर्देश जारी झाले असून, त्यातील ९ एप्रिलच्या आदेशाकडे फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले आहे. यातील मुद्दा क्रमांक ५ स्पष्टपणे सांगतो की, ज्या अतिजोखीम व्यक्तींमध्ये रोगाची लक्षणे नाहीत, परंतू तो कोरोनाग्रस्ताच्या संपर्कात आला आहे, अशांची संपर्कात येण्याच्या पाचव्या दिवसापासून ते १४ दिवसांपर्यंत एकदा तपासणी करण्यात यावी. हा निर्देश असताना मुंबई महापालिकेने १२ एप्रिलला आदेश  काढला. त्यात अशा अतिजोखमीच्या (हायरिस्क) संपर्कांची तपासणी करण्याची गरज नाही, असे म्हटले.

    ‘आयसीएमआर’चेच आदेश राष्ट्रीय पातळीवर पाळत असल्याने त्यात बदल करण्याची काहीच गरज नव्हती. त्यामुळे मुंबई महापालिकेने १२ एप्रिलचा आदेश काढण्याची काहीच गरज नव्हती. तथापि, हा आदेश जारी झाल्यानंतर त्यासंदर्भात विविध माध्यमांमध्ये बातम्या आल्या. त्यानंतर पुन्हा एक आदेश १५ एप्रिलला जारी करण्यात आला. या आदेशाने संभ्रम तयार झाला आहे, याकडे फडणवीस यांनी पत्रात लक्ष वेधले आहे.

    १५ एप्रिलच्या मुंबई महापालिकेच्या आदेशातील मुद्दा क्रमांक डी-१ आणि मुद्दा क्रमांक डी-४ मुळे संभ्रम निर्माण झाला आहे. एकात चाचणीची गरज नाही, असे म्हटले आहे, तर मुद्दा क्रमांक डी-४ चा अर्थ असा होतो की, अशा अतिजोखीम व्यक्तीला पाचव्या दिवशी  निरीक्षण करून म्हणजेच लक्षणे दिसली तरच त्याची चाचणी करता येईल.

    चीनमध्ये कोरोनाच्या ४४ टक्के केसेसमध्ये लक्षणे नसलेल्या व्यक्तींकडूनच संसर्ग दुसर्‍यांना झालेला आहे. केवळ भाषा बदलली असली तरी यातून मुंबई महापालिकेच्या १२ एप्रिलच्याच आदेशाचा अर्थ कायम ठेवण्यात आला आहे. त्यामुळे अतिजोखमीच्या रोगाची लक्षणे नसलेल्या व्यक्तीची तपासणी होण्याची शक्यता दिसत नाही आणि ती केली नाही तर कोणाला जबाबदार देखील धरता येणार नाही. यामुळे आगामी काही दिवसांत मुंबईतील रूग्णसंख्या कमी झाल्यासारखी वाटली तरी त्यामुळे कोरोनाचा प्रसार रोखण्यास मात्र कोणतीही मदत होणार नाही.

    ज्या व्यक्ती कोरोनाग्रस्तांच्या संपर्कात आल्या आहेत, त्यांच्या संसर्गातून नवीन लोक कोरोनाग्रस्त होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेने सुद्धा आयसीएमआरच्या धर्तीवर निर्देश जारी करावेत. कोरोनाग्रस्तांची संख्या कृत्रिमपणे कमी करण्याचा असा प्रयत्न लाखो लोकांच्या जीवासाठी घातक ठरू शकतो. मुंबई महापालिकेला संभ्रम तयार करणारे आदेश बदलण्यासाठी आपण निर्देश द्याल, अशी आशा करतो, असेही फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना विनंती करताना म्हटले आहे.

    Related posts

    नड्डांवर बॅनर्जींची मानभावी “ममता”; कोरोनातून बरे होण्यासाठी दिल्या शुभेच्छा

    पवारांना संभाजीराजेंच्या वाढदिवसाच्या “सारथी” शुभेच्छा

    मोदी सरकारविरोधातील संघर्षात ममतांचा संघराज्य व्यवस्थेलाच धक्का