- आमदार नाही म्हणून उध्दवजी बेचैन आहेत का?
- चंद्रकांत पाटील यांचा सवाल
विशेष प्रतिनिधी
मुंबई : “राजकारण करणे, विरोधकांना आपल्या बंगल्यांवर अपहरण करून आणून मारहाण करणे, आर्थिक गुन्ह्यात अडकलेल्यांच्या मौजमजेची व्यवस्था करणे, आपल्या स्वीय सहायकाला अडवले म्हणून पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई करणे, अधिकाऱ्यांना वेठीला धरून विश्रामगृहांवर पार्ट्या करणे याखेरीज करण्यासारखी असंख्य कामे आहेत. त्याबाबत जयंतराव पाटील यांनी आपल्या सहकार्यांना मार्गदर्शन करणे जरुरीचे आहे,” असा टोला भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ‘राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे मंत्री जयंत पाटील यांना लावला आहे.
“जयंतराव, कोरोना विरुद्धच्या लढाईत सहभागी व्हायचे आवाहन आम्हाला करण्यापेक्षा तुमच्या स्वत:च्या पक्षाच्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना त्याचप्रमाणे तुमच्या आघाडी सरकारमधील सहकारी पक्षांना करा, त्याची गरज सगळ्यात जास्त आहे,” असाही सल्ला चंद्रकांत पाटील यांनी जयंत पाटील यांना दिला आहे.
राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विधानपरिषदेवर नियुक्त सदस्य म्हणून नेमण्याची शिफारस राज्याच्या आघाडी मंत्रिमंडळाने केली. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी आक्षेप घेतला होता. त्यामुळे जलसंपदा मंत्र्यांनी भाजपा प्रदेशाध्यक्षांवर टीकेची झोड उठवली. त्या टीकेला प्रत्युत्तर देताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, “भाजपाचे हजारो कार्यकर्ते आज राज्यभर जीव तोडून मदत कार्य करत आहेत. भाजपाच्या कार्यकर्त्यांकडून ५६० कम्युनिटी किचन्स चालवली जात आहेत. ४३ लाख कुटुंबाना जेवण किंवा शिधा पुरवला जात आहे. साडे सहा लाखांपेक्षा जास्त मास्क आणि पावणे पाच लाख सॅनिटायझर बाटल्यांचे वाटप करण्यात आले आहे. पाच हजार युनिट्स रक्त गोळा केले आहे. रक्त ठेवायला जागा नाही असे रक्तपेढ्यांनी सांगितल्यामुळे रक्तदान थांबवून रक्तदात्यांच्या याद्या तयार करायला सुरुवात केली. आज २२ हजार रक्तदात्यांची यादी भाजपा कार्यकर्त्यांकडे तयार आहेत.”
राज्यात #BJP4Seva अंतर्गत कार्य
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) April 10, 2020
– 560 सामुदायिक स्वयंपाकगृहे सक्रिय
– 42,000 कार्यकर्ते सेवा कार्यात सक्रिय
– 43 लाख लोकांपर्यंत अन्न-धान्य व राशनचे वितरण केले गेले
– 3 लाख लोकांच्या घरांपर्यन्त थेट शेतकऱ्यांमार्फत फळ व भाजीपाला वितरणाची व्यवस्था केली (1/2)#FeedTheNeedy
भाजपाचे सर्व नेते, आमदार, खासदार, सर्व स्तरावरील लोकप्रतिनिधी स्वत: हे काम करत आहेत. कोरोना विरुद्धची लढाई भाजपा पूर्ण गांभिर्याने लढत आहे, असे चंद्रकांत पाटील म्हणाले. या सर्व लढाईत राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस किंवा शिवसेना कुठे आहे, याची माहिती जयंत पाटील ह्यांनी द्यावी, असा प्रश्न पाटील यांनी केला. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या विधान परिषदेवरील नियुक्तीबद्दल चंद्रकांत पाटील म्हणाले की, “मुख्यमंत्र्यांकडे अजून दोन महिने आहेत. हाच ठराव मंत्रिमंडळाने मे-जूनमध्ये केला असता तरी चालणार होते. आता कोरोनाविरुद्धची लढाई लढायचे सोडून हा ठराव करण्यासाठी मंत्रिमंडळाची बैठक का बोलवावी लागली हा माझा प्रश्न होता. आपण आमदार नाही म्हणून मुख्यमंत्री बेचैन आहेत का? आणि ज्या दोन रिक्त जागांचा उल्लेख आपण करत आहात त्यांनी पूर्वीच राजीनामे दिलेत. त्यांनी राष्ट्रवादी पक्ष सोडला म्हणून राजीनामे दिलेत, मुख्यमंत्र्यांना जागा रिकामी करून देण्यासाठी दिलेले नाहीत.”
“राजकारण करणे, विरोधकांना आपल्या बंगल्यांवर अपहरण करून आणून मारहाण करणे, आर्थिक गुन्ह्यात अडकलेल्यांच्या मौजमजेची व्यवस्था करणे, आपल्या स्वीय सहायकाला अडवले म्हणून पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई करणे, अधिकाऱ्यांना वेठीला धरून विश्रामगृहांवर पार्ट्या करणे याखेरीज करण्यासारखी असंख्य कामे आहेत. त्याबाबत जयंत पाटील यांनी आपल्या सहकार्यांना मार्गदर्शन करणे जरुरीचे आहे,” असा तोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला.