विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांसोबतच विविध सामाजिक संस्थादेखील काम करीत आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघदेखील कोरोनाविरोधातील यया लढाईमध्ये संपूर्ण ताकदीने उतरला आहे. देशभरात रा.स्व.संघाचे तब्बल ४ लाख ७९ हजार ९४९ स्वयंसेवक अन्नदान, रक्तदान, स्थलांतरीत मजुरांचे सहाय्य, वैद्यकीय सहाय्य कार्यकर्ते अशा विविध प्रकारे मदत करीत आहेत. त्यामुळे कोरोना संकटातही संघ दक्ष असल्याचे समोर आले आहे.
चीनप्रणित कोरोना विषाणूने संपूर्ण जगास वेठीस धरले आहे. अगदी महासत्ता म्हणविणारे देशही एकीकडे हतबल झाले आहेत. दुसरीकडे भारत मात्र कोरोनाचा यशस्वीपणे सामना करीत आहे. त्यासाठी राज्यांसोबत केंद्र सरकारने साधलेले सुव्यवस्थित समन्वय अतिशय महत्वाचा ठरला आहे. सरकारसोबतच देशातील विविध सामाजिक संस्थादेखील या युद्धात उतरल्या आहेत. विशेष म्हणजे एरवी डावा, उजवा, कम्युनिस्ट, समाजवादी असे भेद असले तरी या संकटाच्या काळात अगदी प्रत्येक संस्था – संघटना मदतकार्यात व्यस्त आहे.
अगदी अशाचप्रकारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघदेखील मदतकार्यात उतरला आहे. देशभरात विविध भागांमध्ये संघ स्वयंसेवक आणि संघ परिवारातील संघटना मदतकार्ये करीत आहेत. आकडेवारीच्या स्वरूपात पाहिल्यास ते अधिक चांगल्या पद्धतीने लक्षात येईल. देशभरात सध्या रा. स्व. संघाचे ४ लाख ७९ हजार ९४९ स्वयंसेवक ८५ हजार ७०१ ठिकाणांमध्ये कार्यरत आहेत. संघाचे कार्य विविध भागांमध्ये विभागण्यात आले आहे. देशभरातील रुग्णांलयांना असलेली रक्ताची गरत लक्षात घेऊन रा. स्व. संघातर्फे आतापर्यंत म्हणजे २० मे पर्यंत ३९ हजार ८५१ युनीट रक्त देशभरातील रक्तदान शिबिरांद्वारे केले आहे. त्यामुळे अनेक ठिकाणच्या अगदी लहानात लहान ते मोठ्यात मोठ्या रुग्णालयांची गरज भागविण्यात मदत होते आहे.
पुण्यात डॉक्टर्सच्या मदतीला सरसावले संघ स्वयंसेवक
जोपर्यंत कोरोनानरील लस अथवा नेमके औषध पुढे येत नाही, तोपर्यंत नागरिकांचे वेळेतच स्क्रिनिंग करून लक्षणे आढल्यास उपचार सुरु करणे, हाच एकमेव मार्ग आहे. कारण कोरोना रुग्णांना वेळीच उपचार सुरू केल्यास त्यांचा जीव वाचतो. त्यासाठी अनेक शहरांमध्ये आता नागरिकांच्या स्क्रिनिंगची मोहिम हाती घेण्यात आली आहे, पुण्यातही ते काम सध्या सुरू आहे. प्रशासन त्यासाठी पूर्ण क्षमतेने कार्यरत असले तरी कुठेतरी त्यांनाही मर्यादा आहेतच. हि मर्यादा भरून काढण्यासाठी रा. स्व. संघाचे स्वयंसेवक पुढे आले आहेत. सध्या पुण्यात ६२५ स्वयंसेवक पीपीई किट परिधान करून आणि आवश्यक ते प्रशिक्षण घेऊन स्क्रिनिंगसाठी प्रशासनास मदत करीत आहेत. त्यासाठी विशिष्ट प्रकारचे मायक्रो नियोजन करण्यात आले आहे. ते म्हणजे एक कार्यकर्ता सलग तीन दिवस काम करतो, पुढील तीन दिवस पूर्ण विश्रांती घेतो आणि सातव्या दिवशी त्याची स्वॅब टेस्ट होते. त्याचा अहवाल निगेटिव्ह आल्यावर मगच त्याला पुढचे सात दिवस ‘होम क्वारंटाइन’ केलं जातं. त्यानंतर तो पुन्हा कामासाठी सज्ज होतो. दर तीन दिवसांनी पथक बदलण्यात येते. रा. स्व. संघाच्या या मोहिमेमुळे पुण्यात प्रशासनास मोठ्या प्रमाणावर मदत होते आहे.
टाळेबंदीमुळे अनेक कुटुंबांना अगदी अन्नधान्याचीही व्यवस्था करणे कठीण झाले आहे, त्यामुळे आजपर्यंत १ कोटी १० लाख ५५ हजार ४५० कुटुंबांना रा. स्व. संघातर्फे रेशन किट्स पुरविण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे तयार अन्नाची ७ कोटी ११ लाख ४६ हजार ५०० पाकिटे देशभरात विविध ठिकाणी पुरविण्यात आली आहेत. फेसमास्कची अनिवार्यता ध्यानात घेऊन ६२ लाख ८१ हजार ११७ मास्कचेही वाटप करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे स्थलांतरीत मजुरांसाठीही संघ स्वयंसेवक विविध माध्यमांतून काम करीत आहे. ती संख्या साधारणपणे २७ लाख ९८ हजार ०९१ एवढी आहे.