विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : आधारद्वारे पेमेंट सेवेत दुपटीने वाढ झाल्याचे स्पष्ट झाले आहे. लॉकडाऊन कालावधीत दररोज सुमारे 1.13 कोटी लोकांनी आधारद्वारे पेमेंट सेवेतून विविध आर्थिक व्यवहार केले.
यामध्ये पंतप्रधान गरीब कल्याण योजनेचे पैसे खात्यातून काढणे, खात्यात पैसे जमा करणे, पैशाची अन्य देवाण घेवाण, बँक बँलन्सची चौकशी आदी व्यवहारांचा समावेश होता. आधारद्वारे पेमेंट सेवेचा लाभ घेत १६,१०१ कोटी रुपयांचे एकूण ४३ कोटी व्यवहार केल्याचे केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले.
सरकारने पंतप्रधान गरीब कल्याण योजनेतून ३४ कोटी लोकांच्या बँक खात्यात ३२,३०० कोटी रुपये थेट जमा केले आहेत. या खात्यातून हे व्यवहार होत आहेत.
तसेच आधारद्वारे पेमेंट सेवेतूनच केंद्र सरकारच्या विविध योजनांचे पैसे देखील लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात येतात. मनरेगाचे रोजगार, विविध लाभार्थी गटांच्या पेन्शन नियमितपणे आधारद्वारे पेमेंट सेवेतून बँक खात्यात जमा करण्यात येतात. यातून सुरक्षित व्यवहार होतात. मध्यस्थांना या व्यवहारांमध्ये स्थानच उरले नसल्याने आर्थिक घोटाळे टळतात.