आत्मनिर्भर अभियानातील २० लाख कोटींच्या पॅकेजने अर्थव्यवस्थेचे पुर्नरुज्जीवन; नोबेल विजेत्या बॅनर्जींकडून तोंडभरून कौतुक
thefocus_admin 28 May 2020 11:25 am 143
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनी व्हायरसविरोधात लढण्यासाठी जाहीर केलेल्या आत्मनिर्भर अभियानातील २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजचे अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक विजेते अभिजित बॅनर्जी यांनी तोंड भरुन कौतुक केले आहे. काही दिवसांपुर्वीच कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी बॅनर्जी यांच्याशी संवाद साधला होता. या संवादात बॅनर्जी यांनी व्यक्त केलेल्या अनेक अपेक्षा मोदी यांच्या आत्मनिर्भर पॅकेजच्या माध्यमातून पूर्ण होत आहेत. त्यामुळेच मोदींच्या या पॅकेजमुळे भारतीय अर्थव्यवस्थेचे पुनरुज्जीवन होईल, असा विश्वास बॅनर्जी यांंनी व्यक्त केला आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनी व्हायरसविरोधात लढण्यासाठी जाहीर केलेल्या आत्मनिर्भर अभियानातील २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजचे अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक विजेते अभिजित बॅनर्जी यांनीही कौतुक केले आहे. या पॅकेजमुळे पुरवठ्यास मदत होऊन भारतीय अर्थव्यवस्थेचे पुनरुज्जीवन होईल असा विश्वास बॅनर्जी यांंनी व्यक्त केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील सर्व घटकांना डोळ्यासमोर ठेऊन चीनी व्हायरसमुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटाला तोंड देण्यासाठी २० लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी या पॅकेजमधील तरतुदींचे सविस्तर विश्लेषणही केले आहे, मात्र, कॉंग्रेससह विरोधी पक्षांनी त्याला विरोध केल असून पॅकेजमध्ये काहीही नसल्याचे म्हटले आहे.
कॉंग्रेसला निवडणुकीच्या काळात न्याय योजना जाहीर करण्याचा सल्ला दिलेले बॅनर्जी यांनी आत्मनिर्भर अभियानाचे कौतुक करून विरोधी पक्षांना चपराक दिली आहे. एका दूरचित्रवाहिनीशी बोलताना बॅनर्जी म्हणाले, हे पॅकेज देशासाठी क्रांतीकारी सिध्द होणार आहे. यामध्ये अनेक महत्वाकांक्षी योजना आहे. यामध्ये नवी आर्थिक व्यवस्था निर्माण करण्याची क्षमता आहे. अर्थशास्त्रातील अनेक नियमांची नव्याने व्याख्या केली आहे. त्यामुळे पुरवठ्याला प्रोत्साहन मिळणार आहे. पुरवठा साखळी आणखी मजबूत होऊन देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे.
सामान्य माणसासाठी या पॅकेजमध्ये खूप चांगल्या गोष्टी असल्याचे सांगताना बॅनर्जी म्हणाले, मागणी-पुरवठा ही साखळी मजबूत झाल्याने सामान्य माणसाच्या आर्थिक कमाईवर त्याचा सकारात्मक परिणाम होणार आहे. मंदीच्या परिस्थितीत सामान्यांसाठी हा मोठा दिलासा ठरणार आहे. आता फक्त मागणी वाढविण्यासाठी सरकारने उपाययोजना करण्याची गरज आहे. सरकारने केलेल्या पॅकेजमुळे अर्थव्यवस्था आणि गरीबांना मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे. प्रत्येक घरात त्यामुळे काही रोख रक्कम मिळू शकेल.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी अभिजीत बॅनर्जी यांची मुलाखत घेतली होती. यावेळी बॅनर्जी यांनी सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या (जीडीपी) १० टक्के ऐवढ्या रकमेचे पॅकेज द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. त्याप्रमाणे मोदी सरकारने २० लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केल्याने बॅनर्जी यांनी समाधान व्यक्त केले आहे. त्याचबरोबर बॅनर्जी यांनी संपूर्ण देशभर एक व्यक्ती एक रेशनकार्ड अशी योजना आणण्याची अपेक्षा व्यक्त केली होती. ही देखील केंद्र सरकारने मान्य केली आहे.