- लॉकडाऊनच्या कालावधीतील दान
विशेष प्रतिनिधी
अयोध्या : श्रीराम जन्मभूमीवर भव्य मंदिर बांधण्यासाठी जनतेने सरकारने स्थापन केलेल्या ट्रस्टच्या खात्यात ४ कोटी ६० लाख रुपयांचे दान जमा केले आहे.
कोरोना लॉकडाऊनच्या काळात सर्व मंदिरे, धार्मिक स्थळे, संस्था बंद असताना भाविकांनी दानरूपाने एवढी मोठी रक्कम श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या खात्यामध्ये जमा केली आहे. सुप्रिम कोर्टाच्या आदेशानुसार केंद्र सरकारने हा ट्रस्ट स्थापन केला आहे.
राम मंदिराच्या कामात पैशाची कमतरता भासू नये यासाठी भक्तांनी, भाविकांनी ही रक्कम दान दिली आहे. अजूनही दान रक्कम ट्रस्टच्या खात्यात जमा होत आहे, अशी माहिती श्रीराम मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी दिली.
रामलल्लांना २७ वर्षे तात्पुरत्या मंडपात राहायला लागले आहे. सध्या छोट्या लाकडी देवघरात रामलल्लांच्या मूर्तीची स्थापना केली आहे. मंडपापेक्षा हे लाकडी देवघर मोठे आहे. पण लवकरात लवकर श्रीराम जन्मभूमीवर भव्य मंदिर तयार होऊन तेथे रामलल्ला विराजमान व्हावेत, अशी भक्त, भाविकांची इच्छा आहे म्हणूनच ट्रस्टच्या खात्यात दानरूपी रक्कम वाढत आहे, असे सत्येंद्र दास यांनी सांगितले.