विशेष प्रतिनिधी
बशीरघाट : पश्चिम बंगालला अम्फान चक्रीवादळाच्या संकटातून बाहेर येण्यासाठी राज्याला तातडीने १००० कोटी रुपयांची मदत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केली. हवाई सर्वेक्षणानंतर ते बोलत होते. राज्यपाल जगदीप धनकर, मुख्यमंत्री ममता बँनर्जी त्यांच्या समवेत होते.
ममता बँनर्जी व राज्य सरकार यांनी या भीषण संकटाची तपशीलवार माहिती दिली आहे. केंद्राची टीम लवकरच येऊन नुकसानीची तपशीलवार पाहणी करेल. त्यानंतर बंगालच्या पुनर्वसनासाठी, पुननिर्माणासाठी पुरेशी मदत दिली जाईल. राज्य सरकारच्या बरोबरीने बंगालचे पुर्निमाण करू, असे आश्वासनही पंतप्रधानांनी दिले.
केंद्र सरकारकडून मदतीच्या अँडव्हान्स रूपात १००० हजार कोटी रुपये, मृतांच्या परिवाराच्या मदतीसाठी प्रत्येकी २ लाख तर जखमींसाठी प्रत्येकी ५० हजार रुपये तातडीने देण्यात येतील. मुख्यमंत्री ममता बँनर्जी यांच्या नेतृत्वाखाली संकटातून उभारण्याचे काम सुरू आहे. केंद्र सरकार राज्य सरकारच्या बरोबर उभे आहे, असेही पंतप्रधानांनी सांगितले. थोर समाज सुधारक राजा राममोहन राय यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी श्रद्धांजली वाहिली.
करोनाचा मुकाबला आणि अम्फान वादळाचा मुकाबला यात परस्पर विरोध आहे. कोरोनाचा मुकाबला घरात राहून करायचा आहे. तर अम्फान वादळाचा मुकाबला घराबाहेर सुरक्षित स्थळी जाऊन करायचा आहे, याची आठवण पंतप्रधानांनी करून दिली.