- मजुरांच्या गैरसोयीच्या नावाखाली केलेल्या आंदोलनात आझमीने काढला होता महिला पोलिस अधिकाऱ्याचा बाप.
- शालिनी शर्मा – आझमी यांच्यात झाली होती बाचाबाची
विशेष प्रतिनिधी
मुंबई : समाजवादी पक्षाचा आमदार अबू आझमीच्या दबावापुढे झुकून ठाकरे – पवार सरकारने नागपाडा पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षक शालिनी शर्मा यांची चेंबूर येथे बदली केली. श्रमिकांना होणारा त्रास आणि त्यांची गैरसोय याचा विरोध करण्यासाठी समाजवादी पक्षाचा नेता आमदार अबू आझमीने नागपाडा येथे रास्ता रोको आंदोलन केल्यानंतर ही बदली करण्यात आली आहे.
यावेळी आझमीने शालिनी शर्मांवर अत्यंत हीन भाषेत टीका करत त्यांचा बाप काढला होता. त्याच वेळी त्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी बोलून शालिनी शर्मा यांच्या बदलीची धमकीच दिली होती.
त्यामुळे या बदलीमागे राजकीय दबाव तर नाही ना, अशी चर्चा पोलीस वर्तुळात आहे. माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आझमीच्या या भाषणाचा विडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
नागपाडा पोलिसांनी योग्य व्यवस्था न केल्यामुळे श्रमिकांचे हाल होत आहेत. योग्य समन्वय नसल्याने त्यांना ट्रेनने गावाला जाता येत नसल्याचा आरोप करीत अबू आझमीने यांनी बुधवारी रात्री नागपाडा जंक्शन येथे आंदोलन केले होतो. यावेळी आंदोलन करणाऱ्यांना समजविण्यासाठी गेलेल्या शालिनी शर्मा यांच्याशी आझमीचा वाद झाला.
आंदोलन करणाऱ्या आणि महिला पोलिसाचा अनादर करणाऱ्या आझमी यांच्यावर गुन्हा दाखल करा, अशी लेखी तक्रार किरीट सोमय्या यांनी केली होती. त्यावर कारवाई करण्याएेवजी शालिनी शर्मा यांची चेंबूर पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली.
मात्र, शालिनी शर्मा यांनीच बदलीसाठी अर्ज केला होता, असा दावा वरिष्ठ पोलिस अधिकारी करीत आहेत. मात्र बदलीमागचे नेमके कारण गुलदस्त्यातच आहे.