उध्दव ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्यापुर्वीच चक्क ‘बेरोजगार’ होते…आणि आता मुख्यमंत्री म्हणून मिळणारा पगार हाच त्यांचा काय तो एकमेव रोजगार (‘सर्व्हिस सेक्टर’) आहे, असे त्यांनी म्हटले आहे. त्यांची पत्नी रश्मी या मात्र बिझनेस वुमन आहेत. ठाकरे कुटुंबाकडे मिळून १४३ कोटींची स्थावर आणि जंगम मालमत्ता आहे. उद्धव ठाकरे यांचे शपथपत्र पाहिल्यावर ‘अशी बेरोजगारी’ सगळ्यांना लाभो, असेच कोणीही म्हणेल…
विशेष प्रतिनिधी
मुंबई : वयाची पन्नाशी उलटलेल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा रोजगार हा मुख्यमंत्रीपदासाठी मिळणारा पगार एवढाच असल्याचे त्यांनी दिलेल्या शपथपत्रात म्हटले आहे. उध्दव आणि रश्मी ठाकरे यांच्या कुटुंबाकडे मिळून १४३ कोटी रुपयांची स्थावर आणि जंगम मालमत्ता आहे. रश्मी ठाकरे या बिझनेस वुमन असल्याचे त्यांनी म्हटले आहे. गंमत म्हणजे, एवढी श्रीमंती असतानाही त्यांच्याकडे स्वतःची एकही गाडी नाही.
ठाकरे यांनी सोमवारी विधान परिषद निवडणुकीसाठी आपला अर्ज भरला. यामध्ये त्यांनी आपली संपत्ती जाहीर केली आहे. उध्दव यांंनी स्वत:चा व्यवसाय ‘सर्व्हीस’ असल्याचे सांगितले असून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून मिळत असलेला पगार त्यांचे उत्पन्नाचे सर्वात मोठे साधन आहे. विविध कंपन्यांचे भाग, विविध कंपन्यांमध्ये भागीदारी आणि त्यांचे डिव्हिडंड असे ठाकरे यांच्या उत्पन्नाचे विविध स्रोत आहेत.
रश्मी ठाकरे बिझनेस वुमेन असल्याचे म्हटले असून भाडे, नफ्याचा हिस्सा हे त्यांचे उत्पन्नाचे साधन आहे. उध्दव ठाकरे यांच्याकडे ७६ हजार रुपये रोख रक्कम आहे. १ कोटी ६० लाख रुपयांच्या बॅँकेच्या ठेवी आहेत. शेअर्स, बॉँडस, फंडसमध्ये मिळून २१ कोटी ६८ लाख रुपये आहेत. त्यांची विमा पॉलीसी ३ लाख रुपयांची आहे. स्वत:च्या नावावर गाडी नाही. २३ लाख रुपयांचे दागिने., इतर वस्तू ५८ लाख अशी मिळून जंगम मालमत्ता २४ कोटी १४ लाख रुपये इतकी आहे.
स्थावर मालमत्तेत शेतजमीन आणि प्लॉट असल्याचे त्यांनी म्हटले आहे. रायगड जिल्ह्यात शेतजमीनीचे ५ प्लॉट आहेत. १९८६ ते १९८८ दरम्यान ते विकत घेतले होते. त्याची किंमत ९५ हजार रुपये आहे. मात्रए त्याठिकाणी बांधलेल्या फार्महाऊसची किंमत ५ कोटी रुपये असल्याचे त्यांनी म्हटले आहे. अहमदनगर आणि माहिम येथेही त्यांचे प्लॉटस असून त्याची किंमत ४ कोटी २०लाख आहे. मात्र, यावर केलेल्या बांधकामाची किंमत सध्याच्या भावानुसार १३ कोटी ७७ लाख रुपये आहे.
ही गाडी आहे कुणाची बरे…?
बांद्रे पूर्व आणि बांद्रे पश्चिम येथे मिळून त्यांच्याकडे ७३ लाख रुपये किंमतीच्या रहिवासी जागा आहेत. यामध्ये एकूण ३ बंगले आहेत. ज्यापैकी वांद्रे पूर्व कला नगर येथे ‘मातोश्री’ बंगला आणि ‘मातोश्री’च्या अगदी समोर बांधले जात असलेले नवे घर आहे. त्यांची स्थावर मालमत्ता ५२ कोटी रुपयांची आहे. स्थावर आणि जंगम मिळून त्यांच्याकडे ७७ कोटी रुपयांची मालमत्ता आहे. उध्दव ठाकरे यांनी एचडीएफसी बॅँकेकडून ४ कोटी रुपये कर्ज घेतले आहे.
उध्दव यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांची स्थावर आणि जंगम मिळून ६५ कोटी रुपयांची मालमत्ता आहे. त्यांचे उत्पन्न १ कोटी५८ लाख रुपये आहे. या दोघांकडे मिळून असलेली संपत्ती १४३ कोटी २६ लाख रुपयांची आहे.
उद्धव ठाकरे यांच्याकडे स्वत:च्या मालकीचे एकही वाहन नसल्याचं त्यांनी प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. मात्र, त्यामुळे कोणाला वाटेल की ते बैठकांसाठी स्वत: चालवित जातात ती गाडी कोणाची? तर ही गाडी त्यांचा मुलगा आणि महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांची बीएमडब्ल्यू आहे. विधानसभा निवडणुकीच्या वेळी आदित्य ठाकरे यांनी शपथपत्र सादर केलं होतं. त्यात त्यांची स्थावर आणि जंगम मालमत्ता 16 कोटी रुपये इतकी आहे असें सांगितलं होते.
आदित्य ठाकरे यांच्याकडे 13 हजार 344 रुपये रोख रक्कम आहे. आदित्य ठाकरेंच्या बँकांमधील वेगवेगळ्या ठेवींची किंमत 10 कोटी 36 लाख इतकी आहे. आदित्य ठाकरेंकडे जवळपास 64 लाख रुपयांचे दागिने आणि मौल्यवान वस्तू आहेत. आदित्य ठाकरेंच्या मालकीची एक बीएमडब्ल्यू कारही आहे. या गाडीची बाजारभावानं किंमत साडे सहा लाख रुपये आहे.आदित्य यांना कल्याणमधील श्रीजी आर्केडमध्ये शॉप( १२५० चौफूट ) आई रश्मी ठाकरे यांनी आँगस्ट २०१९ मध्ये गिफ्ट दिला होता. याची किंमत ८९ लाख ४० हजार होती
- मातोश्रीची मालकी उद्धव यांच्याकडे ७५ टक्के आणि रश्मी यांच्याकडे २५ टक्के आहे.
- उद्धव ठाकरेंविरुद्ध 23 केसेस पेंडिंग आहेत, पण एकातही दोष सिद्धी नाही.
- उध्दव ठाकरे यांनी गेल्या वर्षी ३८ लाख रुपये इन्कम टॅक्स भरला आहे. तर रश्मी ठाकरे यांनी त्यांच्यापेक्षा बरोबर दुप्पट म्हणजे ७९ लाख रुपये इन्कम टॅक्स भरला आहे.
- याशिवाय आदित्य ठाकरे यांची एकूण मालमत्ता 16 कोटी रुपये इतकी आहे. याचबरोबर आदित्य ठाकरेंच्या बँकांमधील वेगवेगळ्या ठेवींची किंमत 10 कोटी 36 लाख इतकी आहे. आदित्यच्या मालकीची एक BMW कारही आहे. या गाडीची बाजारभावानं किंमत साडे सहा लाख रुपये आहे.