भारतीय चित्रपट सृष्टीचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर नेणारी प्रियंका चोप्रा आपल्याला सर्वांची लाडकी अभिनेत्री आहे. प्रियंका ही सध्या भारतातील सगळ्यात जास्त मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. राष्ट्रीय पुरस्कार, फिल्मफेअर पुरस्कार, इमी अवॉर्ड असे बरेच पुरस्कार तिला अभिनय क्षेत्रातील कामगिरीसाठी देण्यात आले आहेत. प्रियंकाला पद्मश्री या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. चित्रपटसृष्टीतला तिचा संघर्ष, तिचे समाजिक कार्य, तिचा बॉलिवुड ते ग्लोबल स्टार होण्यापर्यंतचा प्रवास अगदी थक्क करणारा आहे. चला तर जाणून घेऊयात देशी गर्लच्या प्रवास बद्दल थोडंस…
प्रियंकाचा जन्म :
प्रियंका चोप्रा हीचा जन्म १४ जुलै १९८२ मध्ये जमशेदपूर येथे झाला. प्रियंकाचे आई वडील दोघेही आर्मी मध्ये डॉक्टर होते. स्त्री पुरुष समानता, स्त्रियांचे आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र असणे, एका ठराविक चौकटीत स्वतःला बसवण्याचा प्रयत्न न करता स्वतःच्या पॅशनला फॉलो करणे ही सर्व मूल्ये ती आपल्या आई वडिलांकडून लहानपणीच शिकली होती. त्यामुळे तिचे एक स्वतंत्र आणि प्रभावशाली व्यक्तिमत्त्व निर्माण होण्यात तिच्या आई वडिलांचा मोठा वाटा आहे असे ती आपल्या अनेक मुलखतीत सांगते.
बॉलिवूड आणि प्रियांका :
२००० साली प्रियांकाने मिस वर्ल्ड हा किताब जिंकला. त्यांनंतर तिने चित्रपट सृष्टीत प्रवेश करण्याचे ठरवले. प्रियांकाने सुपरस्टार विजय बरोबर थमिझन (२००२) या तमिळ चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. तर बॉलिवूडमधे तिने ‘हिरो, द लव स्टोरी ऑफ ए स्पाय’ या चित्रपटातून पदार्पण केले. या सिनेमा पाठोपाठ आलेल्या क्रिश आणि डॉन या चित्रपटातून तिने बॉलीवूडमध्ये आपली एक पक्की जागा निर्माण केली. २००८ मध्ये प्रियंकाला तिच्या ‘फॅशन’ या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. त्यानंतर तिने बर्फी, मेरी कोम,सात खून माफ, व्हाट्स युर राशी आणि बाजीराव मस्तानी या चित्रपटातून प्रसिद्धी मिळवली.
हॉलिवूड आणि प्रियांका :
हॉलीवूड मधील ‘Quantico’ या थ्रिलर सीरिजमध्ये ॲलेक्स पॅरिश नावाची भूमिका तिने साकारली. या सीरिझमधे ॲलेक्स पॅरिश एफ बी आय जॉईन करते आणि त्यानंतर ग्रँड सेंटर टर्मिनल येथे झालेल्या आतंकवादी हल्ल्यामध्ये प्राईम सस्पेक्ट बनते. त्या नंतर स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी ती काय काय करते याचा प्रवास म्हणजे ही सिरीज आहे.
यामध्ये तिने केलेल्या रोलचे क्रिटिक्सकडून भरभरून कौतुक करण्यात आले. Quantico या सिरीजसाठी प्रियांका आपल्या आख्या करियरमध्ये पहिल्यांदाच ऑडिशन द्यायला गेली होती. तेव्हा निर्माते तिला घ्यायचे की नाही या गोंधळात पडले होते. परंतु त्यांनी नंतर असे सांगितले की प्रियंकाला बघितल्यानंतर आम्हाला लक्षात आले की, ॲलेक्स पॅरिश हे पात्र फक्त ट्रॅजेडीचा शिकार झालेले नसून तिच्यामध्ये सेन्स ऑफ ह्युमर आणि एक चांगले मन देखील असले पाहिजे. त्यामुळे प्रियंकाला ऑडिशन मधून नाकारले असले तरी तिला नंतर ह्या रोलसाठी निवडले होते. Personality speaks louder than words.
आणि इथून सुरू झाला तिचा हॉलीवूड प्रवास. त्यांनंतर तिने बेवॉच, अ कीड लाईक जेक, इजंट इट रोमँटिक, वी कॅन बी हिरोज ह्या हॉलीवूड सिनेमात महत्वपुर्ण भूमिका निभावल्या. टेक्स्ट फॉर यु आणि द मॅट्रिक्स रिसरेक्शन्स ह्या दोन सिनेमांच्या शूटिंग मध्ये सध्या प्रियांका व्यस्त आहे. प्रियांका ही पहिली भारतीय आहे जिने हॉलिवूड मधील सिरीज मध्ये लीड रोल प्ले केला होता.
प्रियंका चोप्राचे UNICEF मधील काम :
२०१६ मध्ये प्रियंकाला ग्लोबल युनिसेफ गुडविल ॲम्बेसिडर म्हणून नियुक्त केले गेले. २००६ पासून ते आत्तापर्यंत प्रियंका UNICEF मध्ये काम करत आहे. मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणाऱ्या मीडिया पॅनल मधील चर्चमध्ये ती भाग घेत आली आहे. युनिसेफची ग्लोबल ॲम्बेसिडर म्हणून काम करत असताना लहान मुलांवर होत असणारी हिंसा तसेच त्यांचे अधिकार या मुख्य प्रश्नांवरही तिने वेळोवेळी आवाज उठवला आहे. ही जबाबदारी सांभाळत असताना तिने कित्येक देशांमधून प्रवास केला आहे. ज्यामध्ये जॉर्डन, इथिओपिया आणि बांग्लादेश सारखे देश सामील आहेत.
मल्टी टॅलेंटेड बिझनेस वुमन प्रियंका :
प्रियंका ही केवळ एक उत्तम अभिनेत्री नसून ती निर्माती आणि एक चांगली लेखक देखील आहे. नुकतेच तिने आपले ‘Unfinished’ नावाचे पुस्तक प्रकाशित केले आहे. यामध्ये तिने तिच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटना व अनुभव शेअर केले आहेत. प्रियंकाने आत्तापर्यंत १४ चित्रपटांची निर्मिती केली आहे. त्यामध्ये २०२१ साली प्रदर्शित झालेल्या ‘द व्हाईट टायगर’ या चित्रपटाचा समावेश आहे. या चित्रपटाची ती एक्झिक्युटिव प्रोड्युसर आहे.
निर्माती आणि लेखक असण्या सोबतच प्रियंका एक बिझनेसवूमन आहे. न्यूयॉर्कमध्ये तिने ‘सोना’ नावाचे रेस्टॉरंट चालू केले आहे. तिथे उत्तम प्रकारचे भारतीय खाद्यपदार्थ मिळतात. त्याचबरोबर प्रियंकाने स्वतःचा हेअर केअर ब्रँड देखील चालू केला आहे. देशातील अनेक स्त्रियांसाठी आणि तरुणांसाठी प्रियंका एक आदर्श आहे असे म्हणायला हरकत नाही. आज प्रियांकाने अभिनय क्षेत्रातून भारताला आंतरराष्ट्रीय पातळीवर एक वेगळी ओळख निर्माण करून दिली आहे. प्रियंकाच्या पुढील वाटचालीस टीम फोकस इंडिया कडून शुभेच्छा.