वृत्तसंस्था
कोलकाता – पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालानंतर एवढा हिंसाचार झाला आहे, की त्याची तुलना फाळणीच्या वेळी झालेल्या भयानक हिंसाचाराशीच करता येईल, असे सांगत भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी ममता बॅनर्जींचे दुसरे नाव “असहिष्णूता” असल्याचे टीकास्त्र सोडले आहे. West Bengal: BJP chief JP Nadda meets family of party worker Abhijeet Sarkar who was killed in post-poll violence, in Sitala Tala Lane, Beliaghata, Kolkata.
नड्डा यांनी हिंसाग्रस्त बंगालचा दौरा सुरू केला आहे. त्यांनी दक्षिण २४ परगणा, कोलकाता या जिल्ह्यातून दौऱ्याची सुरूवात केली आहे. त्यांनी भाजपचे कार्यकर्ते अभिजीत सरकार शेफाली दास, हरन अधिकारी यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले आणि त्यांना धीर दिला. तृणमूळच्या गुंडांच्या हिंसाचारात अभिजीत सरकार आणि हरन अधिकारी यांना प्राण गमवावे लागले आहेत. अभिजीत सरकार यांच्या वृध्द आईचे आणि हरन अधिकारी यांच्या पत्नी आणि मुलांचे अश्रू कोण पुसणार, असा खडा सवाल नड्डा यांनी ममता बॅनर्जी यांना केला.
ममता बॅनर्जी यांचे दुसरे नाव “असहिष्णूता” असे आहे, अशी टीका करून नड्डा म्हणाले, की त्यांच्या गुंडांनी हरन अधिकारी यांना घरात घुसून मारले. त्यांच्या पत्नीला मारहाण करून दात तोडले. मीडियाने हे सत्य जगासमोर आणले पाहिजे. आता ममता बॅनर्जी यांनी लोकशाहीविषयी बोलावे. तृणमूळ काँग्रेसच्या गुंडांची दादागिरी हीच ममतांची लोकशाही आहे काय… तृणमूळचे कार्यकर्ते एकीकडे हिंसाचार करतात आणि दुसरीकडे हिंसाचार नसल्याच्या फेक न्यूज सोशल मीडियावर चालवतात, अशी टीकाही त्यांनी केली.
कोलकात्यातील बेलियाघाट परिसरातील सितला टोला येथे अभिजीत सरकार यांच्या घरी नड्डा यांनी भेट देऊन त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. यावेळी त्यांच्या समवेत केंद्रीय मंत्री व्ही. मुरलीधरन, भाजप सरचिटणीस भूपेंद्र यादव, दिलीप घोष, लॉकेट चटर्जी आदी होते.