विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी काल दुपारनंतर धारण केलेले म्हणून आज सकाळीच सोडून टाकले. आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी पुन्हा एकदा शरद पवार यांना यूपीएचे चेरमन करण्याची आपली मागणी केली. UPA – Pawar: Sanjay Raut breaks silence; Make Pawar UPA chairman … !!, said again !!
शरद पवार यांना यूपीएचे चेअरमन करावे असा ठराव त्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या मेळाव्यात काल करण्यात आला. या मेळाव्याच्या बातम्या राष्ट्रीय पातळीवर महत्त्वाच्या असल्याचे मानत मराठी माध्यमांनी, “मोठी घडामोड, शरद पवार यांना युपीए चेअरमन करणार”, अशा ठळक हेडलाईनने दिल्या होत्या. या मुद्द्यावर पत्रकारांनी संजय राऊत यांची प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले, शरद पवार यांना यूपीएचे चेअरमन करा ही मागणी मी सहा महिन्यांपूर्वीच केली आहे. सर्व विरोधकांना शरद पवार हे एकत्र करू शकतात आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात मोठी ताकद उभी राहू शकते. पवारांना जर यूपीएचे चेअरमन केले तर यूपीएची ताकद वाढेल, असा दावा देखील संजय राऊत यांनी केला आहे.
– वरूण गांधी – संजय राऊत भेट
संजय राऊत यांनी काल भाजपचे बंडखोर खासदार वरुण गांधी यांना भोजनाचे निमंत्रण दिले होते. त्यानुसार काल रात्री वरुण गांधी आणि संजय राऊत यांच्यात सुमारे दोन तास डिनर डिप्लोमसी रंगली. यावर देखील राऊत यांनी खुलासा केला आहे. वरूण गांधी यांच्या परिवाराचे ठाकरे परिवाराशी चांगले संबंध आहेत. त्यांनी उत्तर प्रदेश निवडणुकीत “विशिष्ट भूमिका” घेतली होती. या मुद्द्यावर आणि देशातल्या अन्य राजकीय आणि सामाजिक मुद्द्यांवर चर्चा झाली, असे संजय राऊत यांनी सांगितले.
नानांनी लावल्या होत्या वाटाण्याच्या अक्षता
संजय राऊत यांनी शरद पवार यांना यूपीएचे चेअरमन करावे ही मागणी यापूर्वी देखील केली होती. मात्र त्याची दखलही काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाने घेतली नव्हती की कोणती प्रतिक्रियाही व्यक्त केली नव्हती. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी मात्र राऊत यांची मागणी पूर्ण झटकून टाकली होती. जी शिवसेना यूपीएची घटकच नाही, त्यांना यूपीएचे चेअरमन कोणी कोणाला करावे? हे सांगण्याचा अधिकारच काय?, असा खोचक सवाल नाना पटोले यांनी केला होता.
– बासनात गुंडाळलेली मागणी पुन्हा चर्चेत
त्यानंतर संजय राऊत यांनी आपली मागणी बासनात गुंडाळून ठेवली होती. काल राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या मेळाव्यात पुन्हा एकदा ठरावाच्या निमित्ताने जेव्हा शरद पवारांच्या यूपीए चेअरमनपदाची बातमी मराठी प्रसार माध्यमांमध्ये आली, त्यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त करून पवारांचे युपीए चेअरमनपद आज पुन्हा महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळाच्या चर्चेत आणले आहे.