- उज्ज्वला 2.0 योजना यंदा 10 ऑगस्ट रोजी एक कोटी एलपीजी कनेक्शन विनातारण देण्यासाठी लॉन्च करण्यात आली होती. UJWALA YOJNA: 8.8 crore LPG gas connections so far under Ujjwala Yojana; Here’s how to apply for a connection online …
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी लोकसभेत माहिती दिली की तेल विपणन कंपन्यांनी उज्ज्वला 2.0 आणि प्रधानमंत्री उज्ज्वला योजना (PMUY) अंतर्गत देशभरात ८.८ कोटी एलपीजी कनेक्शन जारी केले आहेत. पुरी यांनी राज्यसभेत पुरवणी प्रश्नांना उत्तर देताना ही माहिती दिली आहे. सभागृहात गोंधळ सुरू असताना त्यांनी ही माहिती दिली.
उज्ज्वला योजनेंतर्गत देशभरात ८.८ कोटी एलपीजी कनेक्शन जारी
३० नोव्हेंबर २०२१ पर्यंत तेल विपणन कंपन्यांनी उज्ज्वला 2.0 आणि प्रधानमंत्री उज्ज्वला योजना (PMUY) अंतर्गत देशभरात ८.८ कोटी एलपीजी कनेक्शन जारी केलेत.
पीएमयूवाय योजना १ मे २०१६ रोजी देशभरातील गरीब कुटुंबातील प्रौढ महिला सदस्यांच्या नावे तारण न ठेवता आठ कोटी एलपीजी कनेक्शन जारी करण्यासाठी सुरू करण्यात आली होती आणि या योजनेचे लक्ष्य सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्यात आले आहे.
उज्ज्वला 2.0 योजना
उज्ज्वला 2.0 योजना यंदा १० ऑगस्ट रोजी एक कोटी एलपीजी कनेक्शन विनातारण देण्यासाठी लॉन्च करण्यात आली होती. तेल विपणन कंपन्यांनी उत्तर प्रदेशातील मेरठ जिल्ह्यात PMUY अंतर्गत एकूण १.६४ लाख LPG कनेक्शन दिलेत.
एलपीजी कनेक्शन जारी करणे ही एक सतत प्रक्रिया आहे आणि एलपीजी वितरकांना नवीन एलपीजी कनेक्शनसाठी कोणतीही विनंती त्वरित नोंदवण्याच्या सूचना देण्यात आल्यात. २०२१~२२ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात सरकारने प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत आणखी एक कोटी एलपीजी कनेक्शन वाढवण्याची तरतूद केली होती.
प्रधानमंत्री उज्ज्वला योजना-2 अंतर्गत वितरीत केल्या जाणार्या या एक कोटी एलपीजी कनेक्शनमध्ये भरलेले सिलिंडर आणि स्टोव्ह मोफत दिला जाणार आहे. उज्ज्वला योजना-2 चा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांना फार कमी औपचारिकता कराव्या लागतील आणि स्थलांतरित कामगार कुटुंबांना रेशन कार्ड किंवा पत्ता पुरावा लागू करण्याची आवश्यकता नाही. यासाठी स्वयं-घोषणापत्र पुरेसा असेल.
ऑनलाईन अर्ज कसा करावा?
- अर्ज करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम pmuy.gov.in या उज्ज्वला योजनेच्या अधिकृत पोर्टलवर जावे लागेल.
- यानंतर ‘Apply For New Ujjwala 2.0 Connection’ वर क्लिक करा.
- पेजच्या तळाशी तुम्हाला तीन पर्याय (इंडेन, भारत पेट्रोलियम आणि एचपी) दिसतील म्हणजे गॅस कंपन्यांचा पर्याय असेल.
- तुमच्या सोयीनुसार कोणताही एक पर्याय निवडा.
- त्यानंतर विचारलेली सर्व माहिती भरा.
- कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर तुमच्या नावावर एलपीजी गॅस कनेक्शन जारी केले जाईल.