वृत्तसंस्था
जम्मू – जम्मू – काश्मीरमध्ये ३७० कलम हटविल्यानंतर विकास योजनांना वेग आला असून तिरूपतीच्या व्यंकटेश बालाजी मंदिर ट्रस्टचे आणखी एक भव्य बालाजी मंदिर बांधण्यात येणार आहे. या मंदिराचे भूमिपूजन आज मजीन गावात झाले. triupati balaji temple bhoomi pujan in jammu and kashmir
जम्मू – काश्मीरचे राज्यपाल मनोज सिन्हा, केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग आणि गृह राज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांच्या हस्ते हे भूमिपूजन करण्यात आले. जम्मू जिल्हा मुख्यालयापासून १० किलोमीटर अंतरावर मजीन गावात मंदिरासाठी ६२ एकर जमीन घेण्यात आली आहे. त्याच जागेवर आज भूमिपूजन झाले. या मंदिराचे बांधकाम तिरूमला तिरूपती देवस्थान करणार आहे.
मजीनमध्ये मंदिराबरोबरच अन्य सुविधा तसेच वैद्यकीय सुविधा देखील देवस्थान उभारणार असून त्यासाठी राज्य सरकार मदत करणार आहे. मंदिर ट्रस्टच्या वतीने संस्कृत महाविद्यालय आणि वेदपाठशाळा सुरू करण्यात येणार आहे. जम्मू – काश्मीरच्या विकासात आणि अर्थव्यवस्थेत या मंदिरामुळे भर पडेल. कारण या परिसरात धार्मिक पर्यटन वाढेल. स्थानिकांना यातून रोजगारल मिळेल, असे राज्यपाल मनोज सिन्हा यांनी भूमिपूजनानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले.
आंध्र प्रदेशात बालाजीच्या दर्शनासाठी उत्तर भारतातून करोडो भाविक येतात. तसेच माता वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी दक्षिण भारतातून करोडो भाविक येतात. या पार्श्वभूमीवर जम्मू – काश्मीरमध्ये बालाजी मंदिर बांधण्याचा खूप वर्षांपूर्वीपासूनचा संकल्प होता. त्याची सुरूवात आज झाली आहे. जम्मू – काश्मीरमधील बालाजी मंदिर हे राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिक ठरेल, असे जी. किशन रेड्डी यांनी सांगितले.