विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : निवडणूक आयोगाने उमेदवार, त्यांच्या प्रतिनिधींप्रमाणे मतदान अधिकारी आणि केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाच्या जवानांना कोरोना चाचणीचा निगेटिव्ह अहवाल बंधनकारक का केला नाही असा सवाल तृणमूल काँग्रेसने केला.TMC targets election commission once again
आयोगाने चार राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील मतमोजणीसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या. ४८ तासांतील कोरोना चाचणीचा निगेटिव्ह अहवाल केवळ उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींना बंधनकारक आहे.
दरम्यान, टपालाने आलेल्या मतांची इव्हीएममधील मतांआधी मोजणी व्हावी अशी मागणीही तृणमूलतर्फे करण्यात आली. कोरोना साथीमुळे टपालाद्वारे मतदान केलेल्यांची संख्या मोठी आहे. ती मोजण्यासाठी जादा वेळ लागेल. त्यासाठी सूचना जारी करण्यात यावी, अशी तृणमूलची मागणी आहे.
दोन मे रोजी मतमोजणी केंद्रांबाहेर केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाचे सुमारे २३ हजार ते २४ हजार जवान तैनात असतील. धक्कादायक बाब म्हणजे पीपीई किटचा वापर, कोरोना चाचणीचा निगेटिव्ह अहवाल सादर करणे अशा कोणत्याही सूचना त्यांच्यासाठी नाहीत.
यावरून निवडणूक आयोगाला जवानांच्या सुरक्षेचा विसर पडल्याचे दिसते, असे तृणमूलने म्हटले आहे.