उत्तर प्रदेशसह 5 राज्यांमध्ये जे मतदान झाले त्याची वैशिष्ट्ये निवडणूक आयोगाने आज जाहीर केली. यामध्ये महिला मतदारांनी पुरुष मतदारांना मागे टाकल्याचे ठळक वैशिष्ट्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर एक्झिट पोल मध्ये “मतदान पॅटर्न” विषयी चर्चा होताना जातीय आणि धार्मिक ध्रुवीकरण या पारंपारिक विषयांवर वृत्तवाहिन्यांनी मध्ये जरूर चर्चा झाली, पण त्या पलीकडे जाऊन “जेंडर वोटिंग” आणि “क्लास वोटिंग” या विषयावर विचारविनिमय झाल्याचे दिसून आले. एक प्रकारे निवडणूक आयोगाने आकड्यानिशी काढलेल्या निष्कर्षावरच “जेंडर वोटिंग” आणि “क्लास वोटिंग” या विषयीची चर्चा शिक्कामोर्तब करताना दिसली. Status of women in 5 states including Uttar Pradesh exit poll
महिलांनी मोठ्या प्रमाणामध्ये मतदानात भाग घेतला. त्यामुळे योगी सरकार विशेषत: मोदी सरकारच्या कल्याणकारी योजना, गॅस उज्ज्वला योजनेतून कोरोना काळात रेशन देणे उज्ज्वला योजनेतून गॅस सिलेंडर, महिलांच्या नावाने घरबांधणी, शौचालयाची निर्मिती हे मुद्दे आणि उत्तर प्रदेशासारख्या महत्त्वाच्या राज्यांमध्ये महिला सुरक्षेचा मुद्दा अत्यंत महत्त्वाचे ठरल्याचे निष्कर्ष विविध वृत्तवाहिन्यांच्या एक्झिट पोलने काढले आहेत.
महिलांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्यक्तिमत्वाचे आकर्षण हा विषय 2014 पासून चर्चेचा ठरलेला आहे. परंतु 2014 पासून 2022 पर्यंत गेल्या 7 वर्षांमध्ये महिलांनी “स्टेटस वोटिंग” या विषयापर्यंत प्रवास केल्याचे दिसून येते. कारण 2014 मध्ये संपूर्ण परिवर्तनासाठी महिलांनी मतदान केले होते, तर 2022 पर्यंत नरेंद्र मोदी यांनी वेगवेगळ्या पद्धतीने दिलेल्या कल्याणकारी योजना आणि महिलांसाठी विशेषतः सुरक्षा मग ती आर्थिक असो अथवा मानसिक असो याकडे लक्ष देण्यात ते यशस्वी झाल्याचे दिसून येते. यातूनच महिला मतदारांनी “स्टेटस वोटिंग” केल्याचे निष्कर्ष एक्झिट पोलने काढले आहेत.
त्याचबरोबर युवक-युवतींना रोजगार, स्थलांतर, शिक्षण आणि सुरक्षितता हे मुद्दे महत्त्वाचे वाटतात. याकडे एक्झिट पोलमधल्या निष्कर्षांनी लक्ष वेधले आहे, पण त्याचबरोबर युवकांमध्ये विशेषता फर्स्ट टाइम वोटर्समध्ये आपल्या रोजगाराचा प्रश्न पंतप्रधान मोदीच सोडवू शकतात, असा विश्वास त्यांना वाटत असल्याचे एक्झिट पोल मध्ये अधोरेखित होताना दिसते आहे.
उत्तर प्रदेशात “स्टेटस वोटिंग” मध्ये महिला सुरक्षेचा मुद्दा सर्वात वरचा राहिल्याचे स्पष्ट झाले आहे. बाकीचे महिलांविषयीचे मुद्दे उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर या राज्यांमध्ये दिसून आले आहेत.
पारंपरिक पद्धतीच्या विश्लेषणात धार्मिक आणि जातीय ध्रुवीकरण याचा मुद्दा अर्थातच चर्चेचा राहिला आहे. पण त्या पलिकडे जाऊन महिला मतदार हिंदू-मुस्लीम अथवा जातीय ध्रुवीकरण यापेक्षा सुरक्षितता आणि कल्याणकारी योजनांना महत्त्व देत असल्याचे एक्झिट पोलचे निष्कर्ष बरेच काही वेगळेच सांगून जाताना दिसत आहेत. शिवाय त्याला निवडणूक आयोगाने आज जारी केलेल्या आकडेवारीचा आधार आहे ते असल्याचे स्पष्ट झाले आहे.