विनायक ढेरे
नाशिक : नवी दिल्लीतल्या तालकटोरा स्टेडियम मध्ये झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनात माजी उपमुख्यमंत्री आणि विधानसभेतले विरोधी पक्ष नेते अजितदादा पवार नाराज होऊन व्यासपीठावरून निघून गेल्याच्या बातम्या माध्यमांनी दिल्या आहेत. त्या संदर्भातला त्यांचा खुलासाही माध्यमांनी दिला आहे. NCP national convention highlights : photo speaks politically a lot
परंतु राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत फेसबुक पेजवर या अधिवेशनाची जी क्षणचित्रे दिली आहेत, त्यातील छायाचित्रे बरीच “बोलकी” आहेत किंबहुना राष्ट्रवादीतील राजकीय परिस्थितीबाबत ती बरेच राजकीय भाष्य करणारी आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे हे राष्ट्रीय अधिवेशन राष्ट्रवादी युवा काँग्रेस आणि राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने आयोजित केले असल्याने त्यामध्ये विद्यार्थी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया दुहान आणि राष्ट्रवादी युवा काँग्रेसचे अध्यक्ष धीरज शर्मा यांना महत्त्व मिळणे स्वाभाविक होते. त्यांना तसे महत्त्व अधिवेशनात दिले गेले. या दोन्ही तरुण नेत्यांना भाषणाची संधी दिली गेली.
खासदार सुप्रिया सुळे या राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकसभेतल्या गटनेत्या आहेत. त्यांनाही भाषणाची संधी दिली. पक्षाचे ओबीसी नेतृत्व म्हणून छगन भुजबळ यांना, तर महाराष्ट्र प्रदेशाचे अध्यक्ष म्हणून जयंत पाटील यांना भाषणाची संधी मिळाली. व्यासपीठावरील मुख्य पोस्टरवर शरद पवार यांच्या समवेत पक्षाचे सरचिटणीस म्हणून प्रफुल्ल पटेल, लोकसभेतल्या गटनेत्या म्हणून खासदार सुप्रिया सुळे यांच्याबरोबरच सोनिया दुहान आणि धीरज शर्मा यांचे फोटो झळकले होते. बाकी कोणत्याही ज्येष्ठ नेत्याचे फोटो पोस्टरवर नव्हते. हे पोस्टर राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकीय भविष्याचे निदर्शक ठरल्याचे दिसून येत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत फेसबुक पेजवर क्षणचित्रांमध्ये देखील अजितदादा पवारांचा फोटो बराच खाली आहे. ते राष्ट्रीय अधिवेशननिमित्त भरलेले फोटो आणि चित्रप्रदर्शन बघत असल्याचा फोटो, त्याचबरोबर एक त्यांची हसरी छबी एवढे दोनच फोटो अजितदादांचे या पेजवर दिले आहेत. बाकी नेत्यांचे प्रत्यक्ष भाषण करतानाचे फोटो आहेत.
अजितदादांनी अधिवेशनात भाषण करावे, अशी कार्यकर्त्यांची कार्यकर्त्यांनी वारंवार मागणी केल्यानंतर सरचिटणीस आणि सूत्रचालक प्रफुल्ल पटेल यांनी अजित पवारांचे भाषण होईल असे जाहीरही केले. परंतु अजित पवार त्यावेळी व्यासपीठावरून निघून गेले होते शरद पवार यांचे भाषण सुरू झाल्यानंतर ते व्यासपीठावर परत आले. या बातमीची चर्चा राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणावर रंगली. परंतु आता प्रत्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत फेसबुक पेजवरून राष्ट्रीय अधिवेशनाची जी क्षणचित्रे प्रसिद्ध केली आहेत त्यातून देखील महाराष्ट्रातल्या राजकीय स्थितीवर विशिष्ट स्वरूपाचे भाष्य होत आहे. हे भाष्य दुर्लक्ष करण्याजोगे नाही.