वृत्तसंस्था / प्रतिनिधी
नवी दिल्ली : संसदेचे पावसाळी अधिवेशन अनिश्चित काळासाठी स्थगित झाले. आज उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे अध्यक्ष एम. व्यंकय्या नायडू यांना निरोप देण्यात आला. पावसाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी संसदेतल्या कामकाजाचा लेखाजोखा घेण्यात आला त्यावेळी काँग्रेस खासदारांनी सरकारच्या उणीवा काढल्या. पण या उणिवा काढताना आणि विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना छेडताना काँग्रेसचे लोकसभेचे खासदार शशी थरूर यांनी 1962 च्या चीन युद्धाची आठवण काढून तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जखमच जणू उकरून काढली. Shashi Tharoor carves out Nehru’s “wound” of 1962 while teasing Modi
संसदेच्या पावसाळी अधिवेशनात कोणत्या विषयांवर चर्चा झाली नाही, याचा उल्लेख करताना शशी थरूर यांनी गलवान मधील संघर्षाचा उल्लेख केला. चीनशी झालेल्या हिंसक संघर्षात २० भारतीय जवानांना प्राण गमवावे लागले. परंतु संसदेत त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चर्चा घडू दिली नाही. 1962 च्या चीनच्या युद्धाच्या वेळी तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू यांनी संसदेला विश्वासात घेतले होते, याची आठवण शशी थरूर यांनी करून दिली आहे.
पण ही आठवण करून देतानाच एक प्रकारे शशी थरूर यांनी नेहरूंची जखमच उकरून काढली आहे. 1962 च्या चीन युद्धाच्या वेळी नेहरूंनी संसदेत निवेदन केले होते हे खरे. परंतु, त्यापूर्वी सातत दोन वर्षे चीन घुसखोरी करत होता आणि विरोधी पक्षांचे अनेक खासदारच नव्हे, तर काँग्रेस पक्षाचे महावीर त्यागी यांच्यासारखे खासदार चिनी घुसखोरीचा विषय पंडित नेहरूंच्या वारंवार लक्षात आणून देत होते. त्याकडे मात्र नेहरूंनी दुर्लक्ष केले होते. या इतिहासाकडेच जणू शशी थरूर यांनी अंगुली निर्देश केल्याचे स्पष्ट होत आहे.
काँग्रेस हायकमांड नाराज
गलवान संघर्षाच्या मुद्द्यावर शशी थरूर यांनी मोदींवर शरसंधान जरूर साधले पण त्यावेळी नेहरूंचे नाव घेऊन 1962 च्या युद्धाचा उल्लेख केल्याने काँग्रेसमध्ये अस्वस्थता आहे. विशेषतः काँग्रेस हायकमांड नाराज असल्याचे दिल्लीतील राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.