वृत्तसंस्था
सातारा : सातारा शहरासह जिल्ह्यात पावसाची तुफान बॅटिंग सुरु आहे. सर्वत्र तुफान पर्जन्यवृष्टी झाली आहे. जिल्ह्याच्या पश्चिम भागात धुवाँधार पाऊस सुरु असून, कोयना धरणात २४ तासांत तब्बल तीन टीमएमसी पाणी वाढले आहे. c
कराड, महाबळेश्वर, पाटण तसेच जावळी तालुक्यांमध्ये पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. दरम्यान, कराड तालुक्यातील चिखलीत डोंगराजवळील चरात साचलेल्या पाण्यात बुडून एका बालकाचा मृत्यू झाला. सातारा, कराड, जावळी, महाबळेश्वर तालुक्यांत पावसाने पाठ सोडलेली नाही.
कोयना, धोम, कण्हेरसह धरणांमधील पाणीसाठ्यात वाढ झाली. शेतजमीन जलमय झाली असून नद्या, ओढे, नाले पावसाच्या पाण्याने ओसंडून वाहत आहेत.
वाई तालुक्यात पेरणीला वेग येणार
वाई शहर व तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे शेतकरी सुखावले असून हा पाऊस पेरणीसाठी उपयुक्त आहे. आता पेरणीला वेग येईल.
जावळीत मुसळधार पाऊस
जावळी तालुक्यात बुधवारपासून पाऊस सुरू आहे. मुसळधार पावसामुळे जावळी तालुक्यातील डोंगराळ भागातील मरड मुरे, रेंडी मुरे, धनगर पेढा, मेरुलिंग, रुईघर, भालेघर, सायघर, हातगेघर, रांणगेघर आदी भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. बामणोली व केरघळ भागात विक्रमी पाऊस झाला. जावळी तालुक्यात आजपर्यंत 230 मिलिमीटर पाऊस झाला.
पुणे-बंगळुरू महामार्गावर पाणी
कराड : कराड, पाटण तालुक्यात बुधवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसाने कराड शहरातील सर्व बेसमेंटमध्ये पाणी साचले आहे. तर पुणे-बंगळुरू महामार्गावरील गोटे गावाजवळ महामार्गावर पाणी आल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.