विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारतीय हवाई दलाची ताकद वाढवण्यासाठी आणखी तीन राफेल लढाऊ विमानं बुधवारी फ्रान्सहून भारतासाठी रवाना झाली आहेत. फ्रान्समधील भारतीय दुतावासानं ट्वीटद्वारे याची माहिती दिली आहे. या तीन राफेल विमानांनी फ्रान्सच्या मेरिग्नैक-बोर्डो एअरबेसवरुन उड्डाण केलं असून ते आज रात्री उशीरा भारतातील जामनगर एअरबेसवर लँड करतील. जामनगर येथे लँड झाल्यानंतर ही विमानं अंबालासाठी उड्डाण करतील. ही तीन राफेल विमानं भारतीय हवाई दलात सामिल झाल्यानंतर यांची एकूण संख्या २० झाली आहे.3 more Rafales in Indian Air Force
भारतीय हवाई दलानं सांगितलं की, “राफेल विमानांची ही सहावी बॅच आहे.
जी फ्रान्सहून ८ हजार किमीचं अंतर पार करुन भारतात पोहोचणार आहे. दरम्यान, वाटेत हवेतच फ्रान्स आणि युएईच्या हवाई दलाचे जवान या विमानांमध्ये इंधन भरणार आहेत.
२९ जुलै रोजी आली होती पहिली बॅच
पाच राफेल विमानांची पहिली बॅच २९ जुलै २०२० रोजी भारतात पोहोचली होती. या विमानांना गेल्यावर्षी १० सप्टेंबर रोजी अंबालामध्ये अधिकृतरित्या भारतीय हवाई दलात समावेश करुन घेण्यात आला होता. त्यानंतर तीन राफेल विमानांची दुसरी बॅच तीन नोव्हेंबर रोजी भारतात पोहोचली होती. तर तिसरी बॅच २७ जानेवारी २०२१ रोजी पोहोचला होता. तसेच चौथी बॅच ३१ मार्चच्या संध्याकाळी भारतात पोहोचली होती.
भारत आणि फ्रान्समध्ये ३६ राफेल विमानांची डील
दरम्यान, भारत आणि फ्रान्समध्ये ३६ राफेल विमानांची डील झाली आहे. या डीलनुसार, २०२२ पर्यंत फ्रान्स ही सर्व विमानं भारतात पाठवणार आहे. यांपैकी आता २० विमानं भारतात पोहोचली असून उर्वरित १६ विमानं भारतात दाखल होणं बाकी आहे.