विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : कॉंग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी वाड्रा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना आवाहन करताना म्युकरमायकोसिस म्हणजेच काळ्या बुरशीवरील उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या लापोसोमाल अॅम्फोटेरिसिन बी इंजेक्शनच्या टंचाईकडे लक्ष वेधले आहे.
काळ्या बुरशीच्या मुकाबल्यासाठी सरकार पुरेसे गंभीर नसल्याचा आरोप कॉंग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी केला आहे. तसेच, या आजाराचा ५० टक्के मृत्यूदर आणि उपचारावर होणारा लाखो रुपयांचा खर्च पाहता रुग्णांवर सरकारने काळ्या बुरशीच्या रुग्णांवर मोफत उपचार करावेत, अशी मागणीही प्रियांकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली आहे.
देशात २२ मे पर्यंत काळ्या बुरशीचे ८८४८ रुग्ण होते. २५ मेस ही संख्या ११७१७ झाली. तीन दिवसात २८६९ रुग्ण वाढले. तब्बल ५० टक्के मृत्यूदर असलेल्या या गंभीर रोगाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. या रोगाच्या उपचारासाठी लागणाऱ्या इंजेक्शनवर होणारा लक्षावधी रुपयांचा खर्च पाहता इंजेक्शन मोफत द्यावे किंवा काळी बुरशीच्या आजाराचा समावेश आयुष्यमान भारत योजनेमध्ये करावा, अशी मागणीही प्रियांका गांधी वड्रा यांनी केली. याआधी सोनिया गांधी आणि राहुल गांधींनीही काळ्या बुरशीवर मोफत उपचारासाठी केंद्राला आवाहन केले आहे.