वृत्तसंस्था
नवी दिल्ली – निवडणूकीची रणधुमाळी संपली आहे. आपणा सर्वांचे विजयाबद्दल अभिनंदन. आता आपल्याला कोविडशी एकजूटीने लढा द्यायचा आहे, अशा शब्दांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, केरळचे मुख्यमंत्री पिनरई विजयन आणि तामिळनाडूतील डीएमकेचे नेते एम. के. स्टॅलिन यांचे अभिनंदन केले. PM Narendra Modi Congratulates Mamata Didi and victorious leaders
दिवसभर कोविड महामारीसंबंधी आढावा बैठका घेतल्यानंतर पंतप्रधान मोदींनी एका पाठोपाठ एक ट्विट करून सर्व विजयी नेत्यांचे आणि ५ राज्यांमधील जनतेचे अभिनंदन केले. जनतेचे आभारही मानले. सर्व नेत्यांना आणि जनतेला कोविड विरोधातील लढ्यात केंद्र सरकारच्या पाठिंब्याची ग्वाही देखील दिली.
पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, पुद्दुचेरी, आसाममधील जनतेसोबत केंद्र सरकार कायम राहील. आपण सर्वजण एकजूटीने कोविड महामारीवर यशस्वी मात करू, अशी ग्वाही मोदींनी ट्विटरवर दिली.
बंगालच्या कार्यकर्त्यांचे विशेष अभिनंदन
बंगालमध्ये शून्यापासून सुरूवात करून भाजपला मोठे यश मिळवून देणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याचे मी अभिनंदन करतो. बंगाली बंधू – भगिनींचे आभार मानतो. त्यांच्या आशा – आकांक्षांच्या पूर्तीसाठी भाजपचे कार्यकर्ते जीवाचे रान करतील, अशी ग्वाही देतो, असे ट्विट पंतप्रधान मोदी यांनी केले आहे.