देशातील वाहतुकीच्या सुविधा वाढविणारे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या स्वप्नातील एक्सप्रेस वे तयार झाला आहे. आता टोलनाक्यावर टोल कापला जाणार नसून तुम्ही कापलेल्या अंतराप्रमाणे चालत्या गाडीचा टोल कापला जाणार आहे. या रस्त्यावर सिग्नलही नसल्याने वाहने सुसाट जाऊ शकणार आहेत.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : देशातील वाहतुकीच्या सुविधा वाढविणारे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या स्वप्नातील एक्सप्रेस वे तयार झाला आहे. आता टोलनाक्यावर टोल कापला जाणार नसून तुम्ही कापलेल्या अंतराप्रमाणे चालत्या गाडीचा टोल कापला जाणार आहे. या रस्त्यावर सिग्नलही नसल्याने वाहने सुसाट जाऊ शकणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ड्रीम प्रोजेक्ट नावाने ओळखल्या जाणाऱ्या दिल्ली-मेरठ एक्स्प्रेस वे मंगळवारपासून सामान्यांच्या प्रवासासाठी खुला करण्यात आला. मेरठ ते दिल्लीपर्यंतच्या 85 किमीच्या ट्रॅफिकमधून मोठी सुटका झाली आहे. दिल्लीच्या निजामुद्दीनपासून मेरठच्या परतापूरपर्यंत असलेल्या या एक्स्प्रेस वेच्या प्रकल्पावर 2008 मध्ये विचार करण्यात आला.
2014 मध्ये भाजपा सरकार आल्यावर यावर शिक्कामोर्तब झाले. या प्रकल्पाची सुरुवात 2015 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. हा एक्स्प्रेस वे 2019 मध्येच पूर्ण होणार होता, मात्र काही तांत्रिक कारणामुळे त्यास विलंब झाला. 8346 कोटींचा हा रस्ता आता पूर्णपणे तयार झाला असून दररोज या रस्त्यावरून 50 हजार ते 1 लाख वाहने ये-जा करणार आहेत. या रस्त्यामुळे मेरठ ते दिल्ली हे अंतर केवळ 45 मिनिटांत कापता येणार आहे.
एक्स्प्रेस वे सुरु जरी केला असला तरी देखील टोलचे दर अद्याप ठरवलेले नाहीत. यामुळे सध्या सर्व वाहने टोल न देताच जात आहेत. परंतू ऑटोमॅटीक नंबर प्लेट रीडर सिस्टिमद्वारे टोल कापण्यासाठी सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. दर ठरल्यानंतर ही यंत्रणा कार्यरत होणार आहे. हा एक्स्प्रेस वे सिग्नल फ्री आहे. या रस्त्याचे सौदर्य वाढविण्यासाठी कुतुबमिनार आणि अशोक स्तंभासारखी चिन्हे लावण्यात आली आहेत. तसेच दोन्ही बाजुला गार्डन तयार करण्यात आले आहे. या रस्त्यावर ज्या लाईट असतील त्या पूर्णपणे सोलार सिस्टिमवर पेटणार आहेत. हा देशातील पहिला असा रस्ता आहे ज्यावर कार पुढे जात असताना आपोआप टोल कापला जाणार आहे. मेरठ दिल्ली हायवे हा डासनापर्यंत 14 लेनचा आहे. डासनानंतर तो मेरठपर्यंत सहा लेनचा करण्यात आला आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी काही दिवसांपूर्वीच येत्या दोन वर्षांत देशातील रस्ते टोलनाकेमुक्त होणार असल्याचे म्हटले होते. मात्र, त्यानंतर काही दिवसांतच पहिला एक्स्प्रेस वे टोलनाकामुक्त झाला आहे.