- संजय राऊत यांच्यावर अन्याय; मोदी भेटीत पवारांची तक्रार!!
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : ईडीचा वरवंटा अनिल देशमुख, नवाब मलिक, श्रीधर पाटणकर यांच्या मालमत्तांवर फिरला आहे. मात्र, शरद पवार यांची “कृपादृष्टी” फक्त संजय राऊतांवरच झाल्याचे दिसते आहे…!! कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या झालेल्या भेटीत आपण पत्रकार आणि राज्यसभा सदस्य संजय राऊत यांच्यावर झालेल्या अन्यायाचा मुद्दा उपस्थित केल्याचे पवार यांनी आजच्या पत्रकार परिषदेत सांगितले आहे.Modi – Pawar – Raut: ED’s Varvanta Deshmukh – Malik – Patankar; Pawar’s “grace” only on Rauts
राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री अनिल देशमुख आणि नवाब मलिक हे तुरुंगात आहेत. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर झालेल्या आजच्या भेटीत शरद पवार यांनी फक्त सामनाचे कार्यकारी संपादक आणि राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईबद्दल तक्रार केली, असे खुद्द पवार यांनीच पत्रकार परिषदेत सांगितले.
पत्राचाळ घोटाळ्यातील मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने संजय राऊत यांची प्रॉपर्टी जप्त केली आहे. संजय राऊत हे सामनाचे कार्यकारी संपादक आहेत. पत्रकार आहेत आणि राज्यसभेचे सदस्य आहेत. त्यांच्यावर ईडीच्या कारवाईची गरज होती का?, असा सवाल आपण पंतप्रधानांना विचारल्याचे पवार म्हणाले.
अनिल देशमुख आणि नवाब मलिक हे राष्ट्रवादीचे दोन मंत्री तुरुंगात आहेत हा मुद्दा पंतप्रधानांकडे उपस्थित केला होता याबद्दल पवारांना प्रश्न विचारल्यानंतर हा मुद्दा आपण पंतप्रधानांचं उपस्थित केला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच मुख्यमंत्र्यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्यावर देखील ईडीने कारवाई करून त्यांची मालमत्ता जप्त केली आहे याबाबत प्रश्न विचारला असता हा देखील मुद्दा आपण पंतप्रधानांना पुढे उपस्थित केला नसल्याचे पवार म्हणाले.
संजय राऊत यांच्यावर झालेली कारवाई, विधान परिषदेच्या 12 आमदारांची नियुक्ती तसेच लक्षद्वीपमधले काही मुद्दे यावर चर्चा झाल्याचे पवार म्हणाले.
त्यानंतर राज्यातले सरकार पाच वर्षे पूर्ण करेल राज्य मंत्रिमंडळात कोणते फेरबदल होणार नाही बदल झालेच तर ते आपापले पक्षाचे नेते ठरवतील, असे पवार म्हणाले. राज ठाकरे यांच्या बोलण्याला फार महत्त्व देत नाही. केंद्रीय तपास संस्थांच्या तपासासाठी भाजपच्या नेत्यांनी कोणती यादी दिली असेल तर मला माहिती नाही, असे उत्तर पवारांनी एका प्रश्नाला दिले.
प्रत्यक्षात ईडीच्या कारवाईचा वरवंटा राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख, नवाब मलिक तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबधित जरंडेश्वर साखर कारखान्यावर फिरत असताना शरद पवार यांनी फक्त पत्रकार आणि राज्यसभा सदस्य संजय राऊत हाच मुद्दा पंतप्रधानांकडे उपस्थित केला, याला राजकीय दृष्ट्या महत्त्व आहे.