वृत्तसंस्था
चेन्नई : आणीबाणीच्या काळात तत्कालीन काँग्रेस सरकारने राजकीय विरोधकांची कोंडी करण्यासाठी मिसा कायद्याचा बडगा उगारला होता. हा संदर्भ देऊन स्टॅलीन यांनी ठामपणे सांगितले की, मी एम. के. स्टॅलीन आहे. या स्टॅलीनने आणीबाणी आणि मिसा कायद्याचा सामना केला आहे. प्राप्तिकर छाप्यांमुळे मी घाबरून जाणार नाही. आम्ही म्हणजे अण्णाद्रमुकचे नेते नाहीत हे पंतप्रधान मोदी यांना ठाऊक असायला हवे. अशा शब्दांत स्टॅलीन यांनी टीका केली. M. K. stallion targets BJP
दरम्यान, द्रमुकचे पक्षप्रमुख एम. के. स्टॅलीन यांचे जावई शबरीशन यांच्या घरासह विविध चार मालमत्तांवर प्राप्तिकर खात्याच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी छापे घातले. तमिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान चार दिवसांवर आले असताना ही कारवाई झाल्याने राजकीय वाद उद्भवला आहे.
स्टॅलीन यांची कन्या सेंथामराई निलांगराई येथे शबरीशन यांच्यासह राहते. तेथे सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास प्राप्तिकर अधिकारी दाखल झाले. शबरीशन आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या मालकीच्या इतर तीन ठिकाणीही त्याचवेळी कारवाई सुरु झाली. निवडणुकीशी संबंधित रोख रक्कमेची हाताळणी तेथे होत असल्याची माहिती मिळाल्याने छापे घालण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी एका वृत्तवाहिनीला सांगितले. शबरीशन हे स्टॅलीन यांच्या समन्वय समितीमधील महत्त्वाचे सदस्य मानले जातात.
दरम्यान, द्रमुकने याप्रकरणी निवडणूक आयोगाकडे तातडीने तक्रार केली. या पक्षाच्या सूत्रांनी सांगितले की, प्राप्तिकर खाते अधिकाराचा दुरुपयोग करीत आहे. हे अधिकारी आपले कर्तव्य बजावण्याच्या नावाखाली अण्णाद्रमुक-भाजप युतीच्या निवडणुकीतील विजयाच्या संधीला चालना देण्यासाठी सक्रिय आहेत. आयोगाने त्यांना रोखावे.