वृत्तसंस्था
लखनौ – उत्तर प्रदेशाच्या विधानसभा निवडणूका जसजशा जवळ आल्यात तसे राज्यातील नेत्यांनी राजकीय तापमान वाढवायला सुरूवात केली आहे. समाजवादी पक्षाचे नेते माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी अब की “अब की बार 400 पार”चा नारा दिला आहे. उत्तर प्रदेश विधानसभेत एकूण ४०३ जागा आहेत. याचा अर्थ भाजपसकट सर्व विरोधकांना उरलेल्या ३ जागांवर बसविण्याचा त्यांचा इशारा आहे.In Uttar Pradesh, the bar is now over 400; Akhilesh Yadav’s Samajwadi Party slogan
समाजवादी पक्षाने ब्राह्मण मतांचे लांगूलचालन करण्यासाठी राज्यातल्या प्रत्येक शहरांमध्ये भगवान परशूरामांचे भव्य पुतळे उभारण्याचा सपाटा लावला आहे. त्यांना सर्वच्या सर्व म्हणजे १२ टक्के ब्राह्मण मते मिळण्याची अपेक्षा आहे. याखेरीज यादव आणि मुसलमान मतांची टक्केवारी ३० टक्क्यांच्या पुढे आहे. ती आपलीच असल्याचे समाजवादी पक्षाने गृहीत धरले आहे.
त्यातून अखिलेश यादव यांनी अब की बार 400 पार हा नारा दिला आहे. राज्यात परिवर्तनाची जबरदस्त लाट आहे. जनतेला अजिबात भाजपचे राज्य पुन्हा यायला नको आहे. त्यांच्या राज्यात शेतकऱ्यांचे उत्पन्न डबल झाले नाही, तर गॅसची दरवाढ मात्र दुप्पट झाली, असा आरोप अखिलेश यादव यांनी केला आहे.
दरम्यान, एआयएमआयचे नेते खासदार असदुद्दीन ओवैसी हे ७ ते ९ सप्टेंबर दरम्यान उत्तर प्रदेश दौऱ्यावर येत आहेत. ते फैजाबाद, बाराबंकी, सुलतानपूर या जिल्ह्यांमध्ये जाऊन जाहीर सभा घेणार आहेत.
या पार्श्वभूमीवर मुसलमान मतांची बेगमी करण्यात देखील अखिलेश यादव प्रयत्न करीत आहेत. समाजवादी पक्ष ब्राह्मण संमेलनाबरोबर मुसलमान संमेलने देखील घेत आहे.