वृत्तसंस्था
काबूल : ‘तालिबानने काबूलवर हल्ला केला नाही, तर ही राजधानी ताब्यात घेण्यासाठी मीच त्यांना निमंत्रण दिले होते,’ असा दावा अफगाणिस्तानचे माजी अध्यक्ष हमीद करझाई यांनी केला आहे. जनतेचे रक्षण करण्यासाठीच हा निर्णय घेतल्याचेही त्यांनी एका मुलाखतीदरम्यान सांगितले.
‘असोसिएटेड प्रेस’ने घेतलेल्या मुलाखतीदरम्यान हमीद करझाई यांनी अध्यक्ष अश्रफ घनी यांच्या देश सोडून जाण्याच्या आणि तालिबानने सत्ता ताब्यात घेण्याच्या घटनेबद्दल माहिती दिली. ‘‘अश्रफ घनी ज्यावेळी देश सोडून निघून गेले, त्यावेळी त्यांचे सुरक्षा अधिकारीही निघून गेले. संरक्षण मंत्री बिस्मिल्ला खान यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मलाही देश सोडून जाण्याची संधी असल्याचे सांगितले. काबूलमध्ये कोणताही सुरक्षा अधिकारी थांबला नव्हता. अशा वेळी इतर देशविरोधी संघटनांच्या हातात सत्ता जाऊन जनतेची होणारी संभाव्य लुट थांबविण्यासाठी आणि काबूलचे संरक्षण करण्यासाठी तालिबानला सत्ता हातात घेण्याचे मी निमंत्रण दिले,’’ असे करझाई यांनी सांगितले.
हमीद करझाई यांच्या म्हणण्यानुसार, तालिबानने सत्ता ताब्यात घेण्याच्या एक दिवस आधी, म्हणजे १४ ऑगस्टला घडामोडींना वेग आला. करझाई आणि देशाचे मुख्य समन्वयक अब्दुल्ला अब्दुल्ला हे अश्रफ घनी यांना भेटले. दुसऱ्या दिवशी, म्हणजे १५ ऑगस्टला कतारमधील दोहा येथे जाऊन तालिबानबरोबर चर्चा करणार असल्याचे त्यांना सांगण्यात आले. तालिबानचे लोक काबूलच्या सीमेवरच सज्ज होते. दोहा येथील चर्चेत सत्तावाटपाबाबत होणाऱ्या करारानंतरच काबूलमध्ये प्रवेश करणार असल्याचे तालिबानने स्पष्ट केले होते. दुसऱ्या दिवशी मात्र दुपारपर्यंत करझाई यांना कतारला जाता आले नाही आणि तालिबान शहरात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु झाली. दुपारी घनी पळून गेले आणि करझाई यांनी सुरक्षा यंत्रणांकडे विचारणा केली असता कोणताही जबाबदार अधिकारी काबूलमध्ये थांबला नसल्याचे समजले. घनी काबूलमध्येच थांबले असते तर शांतता करार झाला असता. मात्र, ते पळून गेल्याने तालिबानला सत्ता ताब्यात घेण्याचे निमंत्रण दिले गेले.
I welcomed Taliban says karzai
महत्त्वाच्या बातम्या
- महिलांच्या डब्यामध्ये सीसीटीव्हीची नजर; लोकलच्या प्रवासात गुन्हेगारीला आळा
- शिवसेना आमदारांची तक्रार खरीच; आमदार निधी वाटपात शिवसेनेपेक्षा राष्ट्रवादी चौपट!!; काँग्रेसचीही सेनेवर आघाडी
- बांगलादेशातील भव्य रमणा काली मंदिराचे राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन; पाकिस्तानी फौजेने केले होते उद्ध्वस्त!!; भारताने पुन्हा दिले बांधून!!
- पिंपरी : मनसेच्या महिला उपाध्यक्षा अनिता पांचाळ यांच्या गाडीची तोडफोड ; राज ठाकरे पुणे दौऱ्यावर असताना घडला प्रकार